गीताबोध – स्थितप्रज्ञ…

>> गुरुनाथ तेंडुलकर

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला “तू फलाची अपेक्षा सोडून केवळ कर्तव्यबुद्धीने कर्म कर,’’ असं सांगितलं. “त्यासाठी तुला बुद्धी स्थिर राखण्याची आवश्यकता आहे. तू अशाप्रकारे कर्म केलंस तर तुला बुद्धियोग प्राप्त होईल,’’ असंही सांगितलं. आजवर अर्जुनाला भगवंतांनी जे जे काही सांगितलं त्याचा थोडाफार परिणाम होऊन अर्जुन आता विचार करू लागलाय. मी माझ्या नातेवाईकांना, बंधू-बांधवांना आणि गुरूजनांना कसं मारू? हा त्याचा प्रश्न थोडा मागे पडलाय आणि आता तो प्रश्न विचारतोय की…

अर्जुन उवाच… स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव।

स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ।।54।।

भावार्थ ः हे केशवा, समबुद्धीच्या, समाधी स्थितीत असलेल्या कोणाला स्थितप्रज्ञ म्हणावं? हा स्थितप्रज्ञ कसं बोलतो? कसा राहतो? कसा वागतो? या स्थितप्रज्ञाची सगळी लक्षणं मला  समजावून सांगा.

भगवद्गीता या ग्रंथाचं हे एक वैशिष्टय़ आहे की, आपण जसजसे त्यात उतरतो, तसतसा आपल्या अंतकरणातही सकारात्मक बदल होऊ लागतो. नकारात्मक मनोवृत्तीतून सकारात्मकतेकडे जाताना मनात काही प्रश्न उभे राहतात याला ‘शंका’ म्हणत नाहीत, याला ‘जिज्ञासा’ म्हणतात.

“मी युद्ध करणारच नाही,’’ असं म्हणणाऱया अर्जुनाच्या चित्तवृत्तीत झालेला हा सकारात्मक बदल भगवान श्री वेदव्यासांनी अत्यंत योग्यप्रकारे शब्दरूप केला आहे. इथं शब्द वापरलाय ‘स्थितप्रज्ञ.’ अर्जुनाच्या या प्रश्नाचं उत्तर भगवंतांनी पुढच्या अठरा श्लोकांत दिलं आहे. त्या अठरा श्लोकांतून स्थितप्रज्ञाची सगळी लक्षणं अगदी यथायोग्य पद्धतीने समजावून सांगितली आहेत. ती सगळी लक्षणं जाणण्यापूर्वी ‘स्थितप्रज्ञ’ या शब्दाचा नेमका अर्थ काय हे थोडक्यात जाणून घेऊ या.

स्थितप्रज्ञ…ज्याची ‘प्रज्ञा’ म्हणजेच बुद्धी, ‘स्थित’ म्हणजे स्थिर झाली आहे तो स्थितप्रज्ञ.

मागील लेखातील एकेचाळीस ते त्रेपन्न श्लोकांतून भगवंतांनी आपल्याला साधकाची लक्षणं समजावून सांगितली. आता स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना भगवान म्हणतात…

श्री भगवान उवाच… प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान्।

आत्मन्येव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञ तदोच्यते।।55।।

भावार्थ ः हे पार्था, हे अर्जुना, ज्या वेळी साधक मनातील सगळ्या कामनांचा उत्तमप्रकारे त्याग करतो आणि आपण आपला आपल्यातच संतुष्ट राहतो, त्या वेळी त्याची बुद्धी स्थिर होते.

इथं शब्दमर्यादेचं भान ठेवून एक कथा थोडक्यात सांगतो. सम्राट अकबराच्या दरबारी असलेल्या नवरत्नांपैकी एक होते तानसेन. तानसेनांनी एके संध्याकाळी दरबारात ‘दीपराग’ आळवला आणि दरबारातील दिवे आपोआप प्रज्वलित झाले. या चमत्कारानं भारावलेल्या अकबरानं आपल्या गळ्यातील रत्नहार तानसेनाच्या गळ्यात घातला आणि भर दरबारात घोषणा केली की, “जगातील सर्वोत्तम गायक जर कुणी असेल तर तो केवळ आणि केवळ तानसेनच. दुसरा कुणीही नाही.’’

उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून अकबराच्या या घोषणेला दुजोरा दिला. तानसेनाचं अभिनंदन केलं. कौतुक केलं, पण स्वत तानसेनाचा चेहरा मात्र उतरलेला होता. अकबराच्या ते ध्यानात आलं, पण त्या वेळी तो काहीच बोलला नाही. दरबार संपल्यानंतर अकबरानं तानसेनला आपल्या महालात बोलावून घेतलं आणि विचारणा केली. तानसेन सुरुवातीला काहीच बोलायला तयार होत नव्हता, पण नंतर खोदून खोदून विचारल्यानंतर तानसेननं आपल्या गळ्यातील रत्नहार काढून अकबराच्या हातात दिला आणि म्हणाला, “महाराज आपण जर मला जगातील सर्वोत्तम गायक म्हणून हा रत्नहार दिला असेल तर मी तो स्वीकारू शकत नाही. ती योग्यता माझी नाही. माझ्याहून अधिक श्रेष्ठ गायक मला ठाऊक आहेत.’’

“ओह…कोण आहे तो गायक? त्याचं नाव सांग. आपण उद्याच आपल्या दरबारात त्या गायकाचं गाणं ठेवू या.’’

“नाही महाराज. ते गायक आपल्या दरबारात येऊन गाणार नाहीत.’’

“का? कोण आहे तो गायक? आपण त्याच्यासाठी पालखी पाठवू. त्याला हवी तेवढी बिदागी देऊ, पण त्याचं गाणं मला ऐकायचंच आहे.’’ अकबर हट्टालाच पेटला.

“ते गायक आहेत माझे गुरू हरिदास. ते यमुनेच्या किनारी एका आश्रमात राहतात. ते कुठंही जाऊन गात नाहीत. त्यांचं गाणं ऐकायचं असेल तर तुम्हाला त्यांच्याकडे जावं लागेल आणि तुम्ही गाणं ऐकायला आला आहात हे त्यांना कळलं तर ते तुमच्यासमोर गाणारही नाहीत.’’

आता मात्र अकबराची उत्सुकता अधिकच ताणली गेली. तो तानसेनासोबत हरिदासांच्या आश्रमात जायला तयार झाला. दुसरे दिवशी भल्या पहाटे काळोखातून दोघे जण निघाले. आवाज होऊ नये म्हणून घोडय़ाची बग्गी दूर उभी करून चालत चालत आश्रमापर्यंत पोहोचले. पहाटेच्या थंडीच्या यमुनेत स्नान करून आलेले हरिदास गात गात आश्रमाच्या आवारात शिरले आणि आश्रमातील प्राजक्ताच्या झाडावरून ओघळलेली फुलं वेचायला सुरुवात केली. भगवान विष्णूचं एक भजन म्हणत ते फुलं वेचत होते. मध्येच ताना घेत होते. सरगम आळवत होते. आर्त स्वरात परमेश्वराला साद घालत होते. ‘सर्व जगाला सुखी ठेव’ अशी करुणा भाकत होते. त्यांचा तो मधुर स्वर आजूबाजूच्या वातावरणाला अधिकच सुगंधित करत होता. तबला, पेटी, तंबोरा अगदी एकतारी किंवा चिपळ्यांचीदेखील साथ नसताना हरिदास गात होते.

अकबर अगदी मंत्रमुग्ध झाल्यासारखा निश्चल होऊन हरिदासांचं गाणं ऐकत होता. गाणं संपलं. हरिदास आश्रमात गेले आणि अकबर भानावर आला. परत येताना तो तानसेनला काहीच बोलला नाही. मात्र राजवाडय़ात आल्याबरोबर त्याने तानसेनला फर्मावलं, “आजपासून तुझ्या संध्याकाळच्या गाण्याला मी येणार नाही. तू पुन्हा तुझ्या गुरूंकडे जा. ते गातात तसं गायला शिक आणि नंतरच मला तुझं गाणं ऐकव. कालपर्यंत तुला मी सर्वश्रेष्ठ गायक समजत होतो, पण तुझं गाणं तर तुझ्या गुरूंच्या जवळपासदेखील जात नाही. तू त्यांच्यासारखं गाणं गायला शिक.’’

“नाही महाराज. ते मला या जन्मी शक्य होणार नाही.’’ तानसेनची मान खाली गेली होती. तो पुढे म्हणाला, “मी तसं कधीही गाऊ शकणार नाही. कारण मी आपल्या दरबारात गातो ते नवरत्नांपैकी एक मानकरी म्हणून. मी गातो ते मला दरमहा तनखा मिळावा, माझं दरबारातील स्थान आणि मान टिकावा या हेतूनं. मी काहीतरी मनात उद्देश ठेवून गातो. काहीतरी मिळवण्यासाठी गातो आणि माझे गुरू हरिदास मात्र काहीही मिळवायच्या उद्देशानं गात नाहीत. ते गातात कारण त्यांना परमेश्वरानं जे दिलंय त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. मी तुमच्यासाठी गातो. ते स्वतसाठी गातात. मला गाणं गाऊन काहीतरी मिळवायचं आहे. त्यांना भरपूर मिळालंय म्हणून ते गाणं गातात.’’

या श्लोकावर भाष्य करताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात…

जो सर्वदा नित्यतृप्तु। अंककरणभरितु।

परि विषयामाजीं पतितु। जेणें संग कीजे।।

तो कामु सर्वथा जाये। जयाजें आत्मतोषीं मन राहे।

तोचि स्थितप्रज्ञु होये। पुरुष जाणे।।

भगवान श्रीकृष्णांनी स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगताना ‘आत्मन्येव आत्मना तुष्ट’ म्हणजेच आपण आपल्यातच संतुष्ट राहणारा असं जे वर्णन केलं आहे ते हरिदासांच्या बाबतीत तंतोतंत लागू होतं. स्थितप्रज्ञाची उर्वरित लक्षणं आपण पुढील लेखांतून जाणून घेऊ या.

[email protected]