दखल- मार्मिक सामाजिक संदेश

>> अस्मिता प्रदीप येंडे

पात्रांचे लेखक सुनील पांडे यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या साहित्यप्रकारात नवनवीन लेखन केले आहे. आता लेखक पांडे नवेकोरे नाटक घेऊन आले आहेत, ज्याचा विषय खरेतर अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. ते नाटक आहे स्नेहवर्धन प्रकाशन प्रकाशित ‘गणपती तो आला आला’. या नाटकात एकूण 19 दृश्ये असून गणपती बाप्पा, उंदीर मामा, भगवान महादेव, पार्वती माता, 5-6 गणेश कार्यकर्ते, एक पोलीस एवढी मोजकी पात्रे आहेत. या नाटकातील सुंदर प्रसंग म्हणजे बाप्पा आणि उंदीरमामा यांच्यातील स्नेहभाव आणि हलकेफुलके संवाद निरागस भाव वाचताना मजा येते. सामाजिक प्रबोधन करताना लेखकाने पुराणातील काही आख्यायिका सांगितल्या आहेत. जसे की, उंदीरमामा गणपतीचे वाहन कसे झाले, बाप्पाला आवडणाऱया मोदकाच्या निर्मिती कशी झाली, गणेश चतुर्थीला चंद्राचे दर्शन निषिद्ध का मानले जाते, गणपती बाप्पाचे पाण्यात विसर्जन का केले जाते, या विधिवत पूजेला नेमका काय अर्थ आहे, या प्रश्नांची उत्तरे आख्यायिकेतून लेखकाने दिली आहेत. सार्वजनिक मंडळातील सुंदर देखावे, चलचित्रफीत , विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, भजन- कीर्तन इ. पूर्वी पाहायला मिळायचे. आता हे दृश्य पाहायला मिळत नाही. या नाटकाच्या माध्यमातून सणांचे महत्त्व, त्यामागील भाव जपण्याचा अत्यंत महत्त्वाचा संदेश लेखकाने दिला आहे.

गणपती तो आला आला.

लेखक ः सुनील पांडे

प्रकाशक ः स्नेहवर्धन प्रकाशन

मूल्य ः 150 रुपये