
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचे कनेक्शन असल्याचे आता हळूहळू समोर येत आहे. हा हल्ल्याचा कट फेब्रुवारी महिन्यातच रचण्यात आला होता, अशी माहितीही समोर आली असून आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनीच अमेरिका आणि ब्रिटनसाठी गेली 30 वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय, अशी कबुली दिली आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी झटकणाऱ्या पाकड्यांचे पितळ उघडे पडले आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी ब्रिटनच्या स्काय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत दहशतवादाला पाकिस्तानच खतपाणी घालत असल्याच्या अनेक गोष्टींवरून पडदा हटवला आहे. पाकिस्तान दशकांपासून दहशतवादी संघटनांचे समर्थन, सहाय्य आणि त्यांना निधी पुरवण्याचे काम करत होता हा दीर्घ इतिहास राहिला आहे, हे तुम्ही स्वीकारता का, असा सवाल मुलाखतकार याल्दा हकीमने विचारला असता हो, गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ पाकिस्तान अमेरिका आणि ब्रिटनसाठी हे घाणेरडे काम करत आला आहे. अशी कबुली त्यांनी दिली. मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा कसाब हा दहशतवादी जिवंत हिंदुस्थानच्या हाती लागला होता. तरीही पाकिस्तानने तो आमचा नव्हेच असे म्हणत हात वर केले होते, परंतु आता पाकिस्तानचा बुरखा संरक्षण मंत्र्यांनीच टराटरा फाडला आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी वॉशिंग्टनमध्ये झोपत होते, जेवत होते
जर आम्ही सोव्हिएत संघाविरोधातील युद्धात आणि 9/11 च्या अमेरिकेतील ट्विन्स टॉवरवरील हल्ल्यानंतरच्या युद्धात सहभागी झालो नसतो तर पाकिस्तानचा ट्रॅक रेकॉर्ड डागाळला नसता, असेही ख्वाजा आसिफ म्हणाले. अमेरिकेसारख्या मोठ्या शक्तींनी पाकिस्तानला दहशतवादासाठी दोषी ठरवणे त्यांच्यासाठी कठीण नाही. आम्ही त्यांच्यासाठी 1980 मध्ये युद्ध लढलो होतो. पाकिस्तानातील दहशतवादी तेव्हा वॉशिंग्टनमध्ये झोपत होते, जेवत होते, असा आरोपही ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.
हिंदुस्थानच्या कारवाईकडे युद्ध म्हणून बघितले जाईल
लष्कर-ए-तोयबा आता पाकिस्तानमध्ये नाही. या दहशतवादी संघटनेचे येथील अस्तित्व संपलेले आहे. द रेझिस्टन्स फ्रंट ही संघटना पाकिस्तानात कशी जन्म घेईल असे म्हणत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतलेली ही संघटना पाकिस्तानातील नसल्याचे ख्वाजा आसिफ म्हणाले आणि हल्ल्याची जबाबदारी पुन्हा झटकण्याचा प्रयत्न केला. तसेच हिंदुस्थानकडून जी कारवाई होत आहे तिला पाकिस्तान उत्तर देईल. हिंदुस्थानच्या प्रत्येक कृतीकडे, कारवाईकडे युद्ध म्हणून बघितले जाईल, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री म्हणाले, ते स्वातंत्र्यसैनिकच
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हटले आहे. हे स्वातंत्र्यसैनिकही असू शकतात, त्यामुळे त्यांचे आपल्याला आभार मानले पाहिजेत. परंतु, आम्हाला माहीत नाही ते कोण आहेत. मला वाटते, हिंदुस्थानचे सरकार आपले अपयश आणि अंतर्गत राजकारणासाठी पाकिस्तानकडे बोट दाखवत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. इशाक डार हे पाकिस्तानचे उपपंतप्रधानही आहेत. त्यांच्या या विधानामुळे जगभरातून संताप व्यक्त होत आहे.