
>> डॉ. वंदना बोकील–कुलकर्णी
‘अधांतर’ हे जयंत पवार यांचे जबरदस्त नाटक. 1996 मध्ये मंचित झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाची परीक्षणे त्या-त्या वेळी येत गेली. त्यानंतर आता 25-26 वर्षांनी ‘अधांतर’च्या संहितेची चिकित्सा करणारा महत्त्वाचा दस्तऐवज ‘अधांतर ः भूमी व अवकाश’ या ग्रंथाच्या रूपाने राजू देसले यांनी तयार केला आहे.
आपल्याकडे एखाद्या नाटय़संहितेचाच नव्हे तर साहित्यकृतीचाही असा सांगोपांग अभ्यास झाल्याची फार उदाहरणे नाहीत, पण जी आहेत ती अत्यंत मोलाची आहेत. त्यात बालकवींची ‘औदुंबर’ कविता आहे, मर्ढेकरांची ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ ही कविता आहे. नेमाडे यांच्या कादंबऱयांचा सखोल विचार करणारे ‘चांगदेव चतुष्टय़’ आहे, ‘घाशीराम कोतवाल’, ‘बेगम बर्वे’, ‘महानिर्वाण’सारख्या नाटय़संहितांचा अभ्यास आहे. त्याच परंपरेतील हा ग्रंथ.
अशा प्रकारच्या संपादित ग्रंथात संपादकांची दृष्टी फार महत्त्वाची असते. कारण तीच ग्रंथाचे स्वरूप निर्धारित करत असते. काय आहे ही दृष्टी? या ग्रंथाला लिहिलेल्या ‘अधांतर’मध्ये शिरण्यापूर्वी या प्रस्तावनेत राजू देसले लिहितात, ‘ही अधांतरची रूढ अर्थाने समीक्षा नसून नाटय़मूल्यांची समाजशास्त्राrय चिकित्सा आहे.’ संपादक राजू देसले यांनी अंतरंग आणि बहिरंग अशी दोन भागांत मजकुराची विभागणी केली आहे. पहिल्या भागात नाटककार जयंत पवार यांच्यासह या नाटकाचे दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री यांचे नाटकाचे आकलन आले आहे. यात अधिक करून वैयक्तिक अनुभवांचे कथन आहे आणि ते स्वाभाविक म्हणायला हवे. ‘अधांतर’ नाटकात काम करणारे रंगकर्मी आणि दिग्दर्शक मंगेश कदम यांच्या मनोगतांमधून त्यांची नाटकात असलेली खोल गुंतवणूक ध्यानात येते. अनिरुद्ध खुटवड यांनी विविध गटांसह हे नाटक दिग्दर्शित केले आहे. ते म्हणतात, “मराठी नाटय़लेखन चळवळीला नवी भाषा आणि दिशा देणारं हे नाटक आहे,’’ तर किशोर कदम यांनी यातील भूमिका त्यांच्या हातून कशी निसटली याविषयी लिहिले आहे. या नाटकातली सर्वात सशक्त आणि मध्यवर्ती भूमिका करणाऱया ज्योती सुभाष यांना या नाटकाचा अनुभव व जयंत पवार हे आभाळातून आलेल्या देणगीप्रमाणे आपल्या आयुष्यात आले, असे वाटते.
संहितेच्या अंगानेही या नाटकाचा वेध घेतला जावा, हे संपादक राजू देसले यांचे विचार पुस्तकाला आकार देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. त्यामुळे बहिरंग या विभागात तेंडुलकरांपासून ते अलीकडच्या प्राजक्त देशमुखपर्यंत आणि वसंत आबाजी डहाके ते गणेश मतकरी यांच्यापर्यंत 26 अभ्यासक, समीक्षक यांचे लेख आहेत. या ग्रंथातील विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे, रत्नाकर मतकरी, वसंत आबाजी डहाके, दीपक करंजीकर, शांता गोखले, आशुतोष पोतदार, रामू रामनाथन, माया पंडित यांचे लेख फार मौलिक आहेत. या नाटकातल्या समर-प्रसंगांना नाटकातल्या अपरिहार्यतेखेरीज एक जगण्यातली अपरिहार्यता आहे. असा तेंडुलकरांचा अभिप्राय आहे. ते लिहितात, ‘नाटककार नाटक घडवतो, पण मोठे नाटक नाटककाराला घडवते. या नाटकाने जयंतला नाटककार म्हणून घडवले. या नाटकानंतर नाटक लिहिणे जयंतला सोपे उरलेले नाही,’ तर रंगभूमीची भाषा बदलणारे नाटक म्हणून रत्नाकर मतकरींना हे महत्त्वाचे नाटक वाटते.
डहाके लिहितात, ‘मुंबईच्या परळ भागातील, भर वस्तीतील चाळीत असलेल्या दोन खणी खोलीत घडणारे हे नाटक ही एक आधुनिक, अभिजात शोकांतिका आहे.’
दीपक करंजीकर यांचा अभिप्राय आहे, ‘अधांतर’मध्ये अनेक बारीकसारीक अशा तरल धाग्यांनी गिरणी कामगारांच्या परवडीचे महावस्त्र विणले असले तरी त्याचा रुंद पन्हा मध्यमवर्गीय जीवनाची कथा सांगतो आणि त्याचे पोत त्या जीवनाचे ताणेबाणे काय होते याची याद देतो.
अशी परस्पर विरोधी टोकाची मते आणि मतांतरे या साऱयांना या संपादनात वाव आहे. कमलाकर नाडकर्णी वरेरकरांच्या ‘सोन्याचा कळस’ या नाटकाची तुलना ‘अधांतर’शी करतात, तर आशुतोष पोतदार संहितेचे विश्लेषण करताना पात्रांच्या उक्तीकृतींमधून निर्माण होणाऱया वलयांचा विचार मांडतात. ‘अधांतर’ हे गिरणगावाच्या सामाजिकतेचे आणि पर्यायाने तिथल्या एकूण राजकीय-आर्थिक-सांस्कृतिक पर्यावरणाचे दस्तऐवजीकरण आहे, असे अशोक राणे यांना वाटते. माया पंडित पात्रांचे तुटलेपण उलगडून दाखवतात. रामू रामनाथन आणि प्राजक्त देशमुख हे दोन भिन्न विचारधारेचे नाटककार ‘अधांतर’चा निशंकपणे गौरव करतात.
महेंद्र कदम यांनी भाषिक अंगाने संहितेचा अभ्यास मांडला आहे. लीना केदारे, संजय आर्वीकर, एकनाथ पगार, अनिल फराकटे, रणधीर शिंदे, गणेश मतकरी यांनी ‘अधांतर’च्या अन्य लक्षणीय पैलूंचा विचार केला आहे. संध्या नरे-पवार यांनी लक्ष्मी धुरी या स्त्राrपात्राचा बाई आणि आई म्हणून सखोल वेध घेतला आहे.
नाटकाच्या अर्पणपत्रिकेपासून ते रंगसूचनांपर्यंत सर्व नाटय़ घटकांची चर्चा या ग्रंथात आली आहे. यात जवळ जवळ प्रत्येक अभ्यासकाने थोडक्यात का असेना पण नाटय़वस्तूचा, आशयाचा उल्लेख केला आहे, त्यामुळे पुनरुक्ती झाली आहे. ती टाळता आली असती का… त्यामुळे मर्यादित पृष्ठसंख्येत अधिक बांधीव आकार आला असता, असे मात्र वाटते. अर्थात म्हणून या संपादित ग्रंथाचे मोल कमी होत नाही.
अधांतर – भूमी व अवकाश
संपादक – राजू देसले
प्रकाशक ः लोकवाङ्मय गृह, मुंबई.
पृष्ठे ः 440 किंमत ः रु. 600