अनधिकृत पार्किंगबद्दल लोकांमध्ये तुम्हीसुद्धा जनजागृती करू शकता, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना सुनावले

विक्रोळी स्थानकातील बेकायदा पार्किंगप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने आज फटकारले. अनधिकृत पार्किंगबद्दल लोकांमध्ये तुम्ही सुद्धा जनजागृती करू शकता. केवळ तक्रारी करण्याऐवजी आणि अधिकाऱ्यांकडे बोटे दाखवण्याऐवजी, जनभावना असलेल्या व्यक्तींनी समस्येवर उपाय शोधून काढला पाहिजे. त्यासाठी सकाळी 10 ते 5 या वेळेत लोकांना अनधिकृत पार्किंगबाबत जनजागृती करा, असे खडे बोल हायकोर्टाने सुनावले.

विक्रोळी रेल्वे स्थानक रोडजवळ बेकायदेशीर पार्किंग करण्यात येत असून या पार्किंगमुळे गैरसोय होत असल्याचा आरोप करत दिगंबर मुणगेकर व इतर काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात ऍड. यतीन शहा यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली आहे या याचिकेवर आज शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सुनावले. तुम्ही जनजागृती का करत नाही, की येथे पार्किंग बेकायदेशीर आहे, याचिकाकर्त्यांनी मोहीम राबवायला हवी आणि लोकांमध्ये जागरूकता निर्माण करायला हवी की, येथे पार्ंकग बेकायदेशीर असून सर्वसामान्यांची गैरसोय होते. त्यामुळे मोहीम सुरू करा. तुम्ही किती लोकांना पार्ंकग न करण्यासाठी पटवून देऊ शकता त्याबाबत पुढच्या तारखेला आम्हाला अहवाल द्या असे खंडपीठाने सांगितले. त्यावर ऍड. शहा यांनी त्यांच्या अशिलांकडून रेल्वे स्थानकाजवळ जागरूकता मोहीम सुरू करायची आहे का याबद्दल सूचना घेण्यासाठी वेळ मागितला. खंडपीठाने हा वेळ देत सुनावणी तहकूब केली.