सावरकरांवरील राहुल गांधी यांचे वक्तव्य ‘बेजबाबदार’, सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; फौजदारी कारवाईला मात्र स्थगिती

महाराष्ट्रातील एका कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भातील बेजबाबदार वक्तव्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आज फटकारले. मात्र त्यांच्यावरील फौजदारी कारवाईच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत त्यांना दिलासा दिला. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची थट्टा करू नका, असे न्या. दीपांकर दत्ता यांनी राहुल गांधी यांना बजावले.

खुद्द महात्मा गांधीदेखील ब्रिटिशांशी चर्चा करताना ‘तुमचा विश्वासू सेवक’, असे आदरार्थी शब्द वापरत असत. तर राहुल गांधी यांच्या आजी म्हणजे इंदिरा गांधी यांनीही पंतप्रधानपदी असताना सावरकरांना ‘जंटलमेन’ म्हणून संबोधले होते, याची आठवण न्यायालयाने राहुल गांधी यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांना करून दिली.

न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकार आणि तक्रारदार वकील नृपेंद्र पांडे यांना नोटीस बजावली. तसेच, राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या सेशन्स कोर्टाच्या समन्सला रद्द करण्यास नकार देणाऱया अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशालाही स्थगिती देत दिलासा दिला.

तुम्ही (राहुल गांधी) एका राजकीय पक्षाचे नेते आहात. तुम्ही अशी टिप्पणी का करता? महाराष्ट्रात सावरकरांची पूजा केली जाते. पुन्हा असे करू नका.

 न्या. दीपांकर दत्ता