अंधेरीचा गोखले पूल लवकरच खुला होणार, रेल्वे हद्दीतील काम, कनेक्टरचे काम पूर्ण; पश्चिम उपनगरवासीयांना मिळणार दिलासा

पश्चिम उपनगरातील अत्यंत महत्त्वाचा मानला जाणाऱ्या अंधेरीच्या गोखले पुलाचे काम पूर्ण झाले असून हा पूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. रेल्वे हद्दीतील काम, दोन्ही बाजूचे चढ-उतार मार्ग आणि सी. डी. बर्फीवाला पुलाला जोडणाऱ्या ’कनेक्टर’चे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, प्रा. ना. सी. फडके मार्गावरील तेली गल्ली पूल व गोखले पुलाच्या मधल्या भागाच्या काँक्रिट कामाचे ‘क्युरिंग’ आज पूर्ण झाले आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरवासींना मोठा दिलासा मिळणार आहे.

अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची पाहणी अभिजीत बांगर यांनी केली. या पुलाचे मुख्य बांधकाम 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिका प्रशासनाने हा पूल 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित इतर कामे केली जाणार आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आज अंधेरीचा गोखले पूल आणि विक्रोळी पुलाची पाहणी केली. यावेळी प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते यांच्यासह संबंधित अधिकारी, वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांबरोबर समन्वय साधून गोखले पूल वाहतुकीसाठी खुला करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

विक्रोळी पुलाचे काम 95 टक्के पूर्ण

विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाची उर्वरित कामे दिनांक 31 मे 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. या पुलाची एकूण रुंदी 12 मीटर तर लांबी 615 मीटर इतकी आहे. त्यापैकी 565 मीटरची उभारणी पालिकेने केली आहे. या पुलावर टाकण्यात आलेल्या तुळया (गर्डर) सुमारे 25 मेट्रिक टन इतक्या वजनाच्या आहेत. या तुळयांची लांबी 25 ते 30 मीटर इतकी आहे. पुलाच्या तीन टप्प्यांत या तुळया (गर्डर) टाकण्यात आल्या आहेत. प्रत्येक टप्प्यात 6 अशाप्रकारे तीन टप्प्यांत एकूण 18 तुळया टाकण्यात आल्या आहेत.