स्वातंत्र्यांचा मूलभूत अधिकार पाहता कामराने उपस्थित केलेले प्रश्न गंभीरच, चेन्नईला जाऊन तपास करण्याचे निर्देश

संविधानाच्या कलम 19 (1) (अ) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार पाहता याचिकाकर्त्या कामराने याचिकेत उपस्थित केलेले प्रश्न गंभीरपणे विचारात घेण्यास पात्र आहेत. त्यामुळे पोलिसांनी चैन्नईला जाऊन कामराला अटक न करता चौकशी करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले.

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने गायलेले विडंबनात्मक ‘गद्दार’ गीत मिंधे गटाला चांगलेच झोंबल्याने मिंधेंकडून कुणालला धमक्या दिल्या जात आहेत. याप्रकरणी आकसापोटी मिंधेंच्या कार्यकर्त्यांनी कुणालविरोधात चार गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे रद्द करण्यात यावेत तसेच धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाईपासून तातडीने दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करत कुणाल कामरा याने हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

n कामरा यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचे म्हटले आहे म्हणून त्याची सुरक्षा महत्त्वाची असून त्याला काही प्रमाणात संरक्षण दिले जाऊ शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले. पोलिसांना जबाब नोंदवायचा असेल तर चेन्नईमध्ये जाऊन तो नोंदवता येईल, मात्र त्यासाठी रीतसर नोटीस पाठवणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.