Pahalgam Terror Attack – सब बरबाद हो गया!

>> प्रभा कुडके

ये किसने आग लगा डाली नर्म नर्म घास पर, लिखा हुआ है जिंदगी यहा हर एक लाश पर… ‘मिशन कश्मीर’ चित्रपटातील गाण्याचे बोल आजही अंगावर काटा आणतात. असाच अनुभव बैसरन व्हॅलीला भेट दिल्यानंतर आला. पहलगामपासून अवघ्या काही मिनिटांवर असणारे हे ठिकाण पर्यटकांसाठी कायमच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले आहे. 22 एप्रिलच्या हल्ल्यात याच ठिकाणी 26 पर्यटकांना प्राण गमवावे लागले. हल्ल्यानंतर ‘सामना’ प्रतिनिधी येथे पोहोचल्यावर या ठिकाणची खरी परिस्थिती लक्षात आली.

स्थानिक व्यक्तीला सोबत घेत बैसरनचा चढ चढण्यास सुरुवात केली. वाटेतले दगड, चिखल तुडवत अदमासे एक ते दीड किलोमीटर ट्रेक केल्यानंतर हिंदुस्थानी आर्मीकडून आम्हाला रोखण्यात आलं. आगे आप नहीं जा सकते म्हणून थांबवलं गेलं… हल्ल्यानंतर अचानक या ठिकाणची सुरक्षा वाढणं हे साहजिक होतं. हीच सुरक्षा आधी असती तर 26 हकनाक बळी गेले नसते.

बैसरन व्हॅली परिसर हा देवदार वृक्षांच्या दाटीवाटीने वेढलेला असून, मिनी-स्वित्झर्लंड म्हणून या ठिकाणची ओळख आहे. बैसरन येथे फक्त पायी किंवा पोनी राईडने जाता येईल अशीच पायवाट आहे. ओढे, घनदाट जंगल आणि चिखल तुडवत या खोऱ्यात पायीच फिरता येतं. इथल्या अनेक निसरडय़ा मार्गावरून याआधीदेखील अपघात झाले होते. तरीही कश्मीरमधील हे ठिकाण पर्यटकांसाठी कधीही बंद करण्यात आले नाही. इथले स्थानिक आज दबक्या आवाजात इथल्या सुरक्षेविषयी बोलतात. हल्ला झाल्यानंतर तीन तासांनी जवान आले होते. त्याआधी इथे मृत झालेल्यांना स्थानिकांनी पायथ्याशी आणलं होतं. अनेकांना तर इथल्या स्थानिकांनी खेचत खाली नेऊन प्राण वाचवले होते.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साधारणतः पर्यटक वर पोहोचल्यानंतर 2 वाजता अतिरेकी हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे अनेक पर्यटक बिथरले. चिखलात पडले आणि माखले. काहींचे अंगावरील कपडेही फाटले होते. हिंदुस्थानी जवान येण्याआधी स्थानिक पोनीवरून मृतदेह खाली घेऊन आले होते.

एकूणच सध्याच्या घडीला धरतीवरच्या या स्वर्गाबद्दल पर्यटकांच्या मनात द्विधा मनःस्थिती दिसून येत आहे. कोण चांगला आणि कोण वाईट हे नेमकं कसं जाणून घ्यायचं, असा प्रश्न पर्यटकांच्या नजरेत आहे.

या हल्ल्यानंतर पहलगाममध्ये चिटपाखरूदेखील नाही. सध्या माध्यमांचे प्रतिनिधी आणि ओस पडलेल्या बाजारपेठा दिसत आहेत. कश्मीरचे चौक सुने पडलेले आहेत. कश्मिरींची मनं दुभंगलेली आहेत. उषःकाल होता होता काळरात्र झाली अशीच काहीशी अवस्था कश्मीरमध्ये सध्या अनुभवायला मिळत आहे. इथल्या वातावरणात गारवा असला तरी अतिरेकी हल्ल्यामुळे संतापाची गरमी इथल्या गल्लीबोळांमध्ये जाणवते आहे. इथल्या स्थानिकाच्या तोंडी केवळ एकच वाक्य आहे, सब बरबाद हो गया…