
पहलगाममध्ये जे काही घडले त्यामागे समाजात फूट पाडणे हा एकमेव उद्देश होता, असे नमूद करतानाच दहशतवादाविरोधात एकत्र येऊन लढूया, असे आवाहन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी हे आज श्रीनगरच्या दौऱयावर होते. यावेळी त्यांनी श्रीनगर येथील लष्कराच्या रुग्णालयात जाऊन हल्ल्यातील पीडितांची, जखमींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
दहशतवादाविरोधात आणि पहलगामसारख्या हल्ल्यांविरोधात संपूर्ण देशातील नागरिकांनी एकत्र येऊया, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. पहलगाममध्ये झालेला हल्ला भयंकर होता. मी इथे काय चालले आहे ते पहाण्यासाठी आणि येथील लोकांच्या मदतीसाठी आलो आहे, असे राहुल गांधी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. संपूर्ण जम्मू-कश्मीरमधील जनतेकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध होत असून सध्याच्या घडीला ते देशाच्या पाठिशी आहेत असे सांगतानाच दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेतली, असेही त्यांनी सांगितले.
कुटुंबातील सदस्य गमावलेल्या प्रत्येकाप्रती सहवेदना
ज्यांनी दहशतवादी हल्ल्यात कुटुंबातील सदस्य कमावले त्या प्रत्येकाच्या प्रती माझ्या सहवेदना, प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतो असेही राहुल गांधी म्हणाले. मी प्रत्येकाला सांगू इच्छितो की संपूर्ण देश त्यांच्या पाठिशी एकत्रितपणे उभा आहे, असे त्यांनी सांगितले.
विरोधकांचा सरकारला पाठिंबा
गुरुवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला तसेच सरकार जी काही कारवाई करेल त्याला पूर्ण पाठिंबा दर्शवला अशी माहिती राहुल गांधी यांनी यावेळी दिली. दहशतवाद्यांकडून अशाप्रकारचे हल्ले समाजात फूट पाडण्यासाठी सुरू आहेत. त्यांच्या या कृतीविरोधात संपूर्ण देशाने एकत्र उभे रहायला हवे, असेही ते म्हणाले.
कश्मिरी विद्यार्थ्यांबद्दल चिंता
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना मिळणाऱया धमक्या आणि त्यांना देण्यात येणारा त्रास याबद्दलही राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली. कश्मिरसह देशभरातील माझ्या भाऊ-बहिणींवर हल्ले होत आहेत ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, राहुल गांधी यांनी जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचीही आज भेट घेतली. याबद्दलही राहुल गांधी यांनी सांगितले. दोघांनी मला हल्ल्याबाबतची माहिती दिली. माझा पक्ष आणि माझा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, असे मी त्यांना सांगितल्याचे राहुल गांधी म्हणाले.