
अमेरिकेतील कमी होणारा जन्मदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सतावत आहे. देशात मुलांची संख्या वाढावी यासाठी ट्रम्प सरकारने महिलांना एक आर्थिक प्रोत्साहन भत्ता देण्याचा प्रस्ताव आणण्याचे ठरवले आहे. ‘न्यूयॉर्प टाइम्स’च्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील महिलांनी लग्न करण्यासाठी आणि मुलांना जन्माला घालण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील यासंबंधीचा सल्ला तज्ञांकडून मागितला आहे. ट्रम्प यांच्या सहकाऱयांनी अमेरिकनवासीयांना जास्तीत जास्त मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. यासाठी आर्थिक मदत देण्याचा प्रस्तावसुद्धा ठेवला आहे.
‘व्हाईट हाऊस’मधील या मुद्द्यावर काही मागितलेले सल्ले समोर आले आहेत. यात चीनमध्येही मुलांची संख्या वाढवण्यासाठी विशेष पावले उचलली जात आहेत. काही शहरांत एका मुलाच्या जन्मावर 1 लाख युआन म्हणजेच 13,800 डॉलरची चाइल्डकेअर सबसिडी दिली जाते. स्वित्झर्लंडच्या अल्बिनेन गावात मुलाच्या जन्मानंतर 50 लाख रुपये दिले जातात. तसेच प्रत्येक नवजात बाळासाठी 8 लाखांची मदत केली जाते. जर्मनीत प्रत्येक पालकांना मुलांसाठी 250 युरो म्हणजेच जवळपास 23,572 रुपये दिले जातात. फिनलँडमध्ये जन्माला येणाऱया प्रत्येक मुलाला सरकारकडून 7 लाख 86 हजार रुपये दिले जातात. फ्रान्समध्येही सरकार गर्भवती महिलांना 8 महिन्यानंतर 900 युरो म्हणजेच जवळपास 80 हजार रुपये देते. तसेच महिलांना 16 आठवडय़ांची पेड मातृत्व रजा देते. या देशांसह जगातील अन्य काही देशांतही लोकसंख्या वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.
महत्त्वाचा प्रस्ताव म्हणजे फुलब्राइट स्काॅलरशिपचा 30 टक्के हिस्सा त्या लोकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ज्यांचे लग्न झाले किंवा ज्यांना मुले आहेत, तसेच प्रत्येक नवजात मुलाच्या आईला 5 हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास 4 लाख 25 हजार रुपये ‘बेबी बोनस’ म्हणून देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.