
व्यापार युद्धे आता फक्त टॅरिफ आणि डिप्लोमसीपुरती मर्यादित राहिलेली नाहीत. चीनमधील कारखाने आता सोशल मीडियाला नवीन शस्त्र बनवत आहेत. ते ‘टिकटॉक’सारख्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ बनवून अमेरिकन ग्राहकांना थेट कारखान्यांतून उत्पादने खरेदी करण्यास प्रोत्साहन देत आहेत. डोनाल्ड ट्रम्प सरकारने चीन वस्तूंवर 245 टक्के कर लादून चीनच्या आर्थिक नाडय़ा आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र चिनी कंपन्यांनी आता वेगळा ट्रेड वॉर सुरू केलाय. चिनी कंपन्या अमेरिकन ग्राहकांना थेट सांगत आहेत, ब्रँड विसरून जा, तेच उत्पादन थेट कारखान्यातून खरेदी करा. तेही अगदी कमी किमतीत. चिनी कंपन्या अमेरिकेत विकल्या जाणाऱया उत्पादनांपेक्षा 26 पट कमी किमतीत वस्तू पुरवण्याचे आश्वासन देत आहेत. चिनी टिकटॉक युझर्स वांग सेन याचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. व्हिडीओला दोन कोटी ह्यूज आहेत. व्हिडीओमध्ये तो स्वतःला मूळ निर्माता म्हणतो आणि हर्मीससारख्या महागडय़ा ब्रँडच्या बॅग्ज दाखवतो. तो म्हणतो, तुम्ही आमच्याकडून थेट का खरेदी करत नाहीत? तो अमेरिकेत एक लाख रुपयांना मिळणारे उत्पादन पाच हजार रुपयांना विकण्याचा दावा करतो. हुआंग शी नावाचा आणखी एक युझर चॅनेल आणि बिर्पेस्टॉकसारख्या ब्रँडची उत्पादने खूप कमी किमतीत उपलब्ध असल्याची माहिती टिकटॉकवरून देतो. अमेरिकेत डी मिनिमिस एक्झम्पशन पॉलिसीअंतर्गत 5 हजारांपेक्षा कमी किमतीच्या पार्सलना कस्टम डय़ुटीतून सूट आहे.
कर्मचाऱयांना सोशल मीडियाचे धडे
चीनमधील ग्वांगझू, शेन्झेन आणि यिवूसारख्या ठिकाणांवरील कारखाने आता कर्मचाऱयांना सोशल मीडिया प्रशिक्षण देत आहेत. जेणेकरून या कर्मचाऱयांनी टिकटॉक इन्फ्लुएन्सर बनून आपल्या उत्पादनांचे प्रमोशन करावे. यूएस प्ले स्टोअरवर चीनची काही अॅप्स टॉप नंबरला आहेत. अमेरिकन लोकांनाही हे उत्पादन थेट खरेदी करणे फायदेशीर वाटत आहे.