इव्हेंटची नौटंकी बंद करा! डोंबिवलीत शिवसेनेची शोकसभा, जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी भाजप, मिंधे गटाला सुनावले

कश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात हकनाक बळी गेलेल्या निष्पाप डोंबिवलीकरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शोकसभेचे आयोजन केले होते. डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी होत हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी भाजप आणि मिंधे गटाने कश्मीरात अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय हे दाखवण्याचा आटपिटा चालवला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी सुरू असलेल्या हापापलेपणाचा जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी जोरदार समाचार घेत इव्हेंटची नौटंकी बंद करा, असे या शोकसभेत सुनावले.

शोकसभेत बोलताना दीपेश म्हात्रे यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. टीव्ही लावला तर कश्मीरला मी पहिला जातो की तू अशी स्पर्धा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांमध्ये लागलेली दिसते. तिथे अडकलेल्या लोकांना स्वतःचा जयजयकार करायला लावता त्याची लाज वाटत नाही का, असा सवाल दीपेश म्हात्रे यांनी करत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. शोकसभेला शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे, अभिजित सावंत, सुरेश परदेशी, प्रकाश वाणी, महिला जिल्हा संघटक वैशाली दरेकर-राणे, राहुल भगत, अजय पोळकर, प्रमोद कांबळे, अंकुश म्हात्रे यांच्यासह डोंबिवलीकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.