Pahalgam Attack – नियंत्रण रेषेवर संघर्ष सुरू; पाकड्यांचा LoC वर रात्रभर गोळीबार, हिंदुस्थानी लष्कराचं चोख प्रत्युत्तर!

जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये 26 निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. या हल्ल्यानंतर जगभरातील देशांनी दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी हिंदुस्थानला पाठिंबा दिला होता. दुसरीकडे देशभरातून पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. अशात हिंदुस्थाननेही काही मोठे निर्णय घेत पाकड्यांची कोंडी केली. यामुळे सैरभैर झालेल्या पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आगळीक करण्यास सुरुवात केली असून एलओसीवर रात्रभर गोळीबार केला. याला हिंदुस्थानी लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.

पहलगाम येथील हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संबंध अधिक चिघळले आहेत. अशातच पाकिस्तानी सैन्याने काही ठिकाणी लहान शस्त्रांनी गोळीबार केला. शुक्रवारी रात्रभर हा गोळीबार सुरू होता. पाकिस्तानच्या या गोळीबाराला हिंदुस्थानी लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे. या गोळीबारामध्ये अद्याप दोन्ही बाजूने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘एएनआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

बांदिपुरात चकमक

पहलगाम हल्ल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-कश्मीरमध्ये चकमक सुरू असून शुक्रवारी सकाळी बांदीपुरा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. कुलनार भागामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत.

उधमपूरमध्ये एक जवान शहीद

तत्पूर्वी शुक्रवारी उधमपूर जिल्ह्यातील दुदु-बसंतगड जिल्ह्यातील जंगलामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. यात हवलदार झंटू अली शेख शहीद झाले. चकमकीदरम्यान ते गंभीर जखमी झाले होते, मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

लष्करप्रमुखांचा दौरा

पहलगाम हल्ल्यानंतर तिन्ही सैन्यदलांना अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. अशातच लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे श्रीनगर आणि उधमपूरचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते कश्मीर खोऱ्यामध्ये तैनात वरिष्ठ लष्करी कमांडर आणि इतर सुरक्षा संस्थांच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील.

अ‍ॅक्शन घ्या, दहशतवादी तळ उद्ध्वस्त करा, आमचा पाठिंबा! देशाच्या सुरक्षेसाठी विरोधी पक्ष सरकारसोबत भक्कम