आईचा तोल गेला.. बाळ 21 व्या मजल्यावरून कोसळले, विरारमधील दुर्दैवी घटना

खिडकी बंद करताना खांद्यावरील सात महिन्यांचे बाळ थेट 21 व्या मजल्यावरून कोसळल्याची दुर्दैवी घटना विरारमध्ये घडली. त्यात बाळाचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान लहान मुलांना सांभाळा.. त्यांची काळजी घ्या.. असे आवाहन करण्यात आले आहे.

विरार पश्चिमेच्या बोळींज येथे जॉय विले नावाचे निवासी संकुल आहे. या संकुलात पिनॅकल नावाची इमारत असून 21 व्या मजल्यावरील 2104 या सदनिकेत विकी सदाने आणि पूजा सदाने हे दाम्पत्य राहते. त्यांना 7 महिन्यांचे बाळ होते. बुधवारी दुपारी सवातीनच्या सुमारास पूजा सदाने या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या. मात्र खिडकीजवळ पाणी पडल्याने त्यांचा पाय घसरला आणि त्यांचा तोल गेला. यामुळे त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ 21 व्या मजल्यावरून थेट खाली पडले. या दुर्घटनेत बाळाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे सदाने दाम्पत्याला 7 वर्षांनंतर बाळ झाले होते. मंगळवारी बाळाला 7 महिने पूर्ण झाले होते.

खिडकीला जाळी नसल्याने घात
बुधवारी विकी सदाने नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. बाळाला बघण्यासाठी नातेवाईक घरात आले होते. महिला खिडकी बंद करताना तिचा तोल गेला आणि खांद्यावरील बाळ खाली पडले, अशी माहिती बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिली. या खिडकीला पूर्ण जाळी नव्हती. त्यामुळेच घात झाल्याचे बोलले जाते.