घोडबंदर रोडवर वाहनचालकांचा चार दिवस घामटा निघणार, रस्ते दुरुस्तीसाठी गायमुख घाटाचा एक मार्ग बंद

वाहतूककोंडीने ठाणेकरांचे आधीच कंबरडे मोडले असताना घोडबंदर रोडवर वाहनचालकांचा चार दिवस घामटा निघणार आहे. ठाण्याहून घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या वाहिनीवरील गायमुख घाटच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे येत्या 26 ते 29 एप्रिलपर्यंत एक मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, वाहतुकीत बदल करण्यात आल्याने ठाण्यात वाहतूककोंडी होणार आहे.

ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या घोडबंदर रोडवरून गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांतून येणाऱ्या सर्वच प्रकारच्या वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नागरीकरण वाढले आहे. दुसरीकडे या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहनचालकांना दररोज वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. दरम्यान, पावसाळ्यापूर्वी गायमुख घाटरस्त्याच्या कामासाठी वाहतूक बदल केले आहेत.

ठाण्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहने वाय जंक्शनकडून खारेगाव, माणकोली, अंजुरफाटामार्गे इच्छितस्थळी जातील.

मुंब्रा, कळव्याकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेशबंदी आहे. पर्यायी मार्ग मुंब्रा, कळव्याकडून घोडबंदरकडे जाणारी वाहने खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजुरफाटामार्गे जातील.

गुजरातहून घोडबंदरमार्गे येणाऱ्यांना वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेशबंद तर या वाहनांना कामण, अंजुरफाटा, माणकोली, भिवंडीमार्गे इच्छितस्थळ गाठता येणार आहे.