
तलावांचे सुशोभीकरण आणि संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येतो. पण प्रत्यक्षात तलावात होणाऱ्या प्रदूषणासंदर्भात ठाणे महापालिका गंभीर नसल्याचे उघड झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सिद्धेश्वर तलावात सांडपाणी, जलपर्णीने आज हजारो माशांचा बळी घेतला. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही तलाव स्वच्छ करण्यात आला नसल्याने महापालिकेचा प्रदूषण नियंत्रण विभाग करतोय काय? असा सवाल ठाणेकरांनी केला आहे.
तलावांचे शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे. मात्र ही ओळख आता हळूहळू पुसू लागली की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. शहरात जेमतेम 30 तलाव शिल्लक असून बरेच तलाव अत्यंत प्रदूषित झाले आहेत. सिद्धेश्वर तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. सिद्धेश्वर तलावाला झोपडपट्टीचा विळखा पडला असून मोठ्या प्रमाणात सांडपाणी देखील सोडण्यात येते. तसेच हा तलाव डम्पिंग ग्राऊंड झाला असून स्थानिक नागरिक घरातील कचरा थेट तलावात फेकत असल्याचे निदर्शनास आले आहे.
लवकरच उपाययोजना
सिद्धेश्वर तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी सोडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जलपर्णीदेखील मोठ्या प्रमाणावर आहे. तलावातील मृत मासे आणि जलपर्णी हटवण्याचे काम तत्काळ सुरू करण्यात आले आहे. तलावात सांडपाणी जाणार नाही याबाबत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करण्यात येणार आहे.
मनीषा प्रधान (मुख्य पर्यावरण अधिकारी)