Pahalgam Attack – पाकिस्तानचा ‘गेम’ अटळ! आधी ट्रम्प यांचा मोदींना फोन, आता US च्या परराष्ट्र विभागानंही भूमिका केली स्पष्ट

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. या दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातील प्रमुख देश हिंदुस्थानसोबत ठामपणे उभे राहिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. आता अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनीही स्पष्ट भूमिका घेतली असून दहशतवाविरोधात लढण्यासाठी आम्ही हिंदुस्थानसोबत असल्याचे म्हटले आहे. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी हिंदुस्थान-पाकिस्तानी सीमेवरील तणावाबाबत प्रश्न विचारणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराचीही त्यांनी बोलती बंद केली.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवरील तणाव वाढला आहे. याबाबत टॅमी ब्रूस यांनी अमेरिकेची भूमिका स्पष्ट करत पहलगाम हल्ल्याची तीव्र शब्दामध्ये निंदा केली. या संकटाच्या वेळी अमेरिका हिंदुस्थानसोबत उभा असल्याचेही त्या म्हणाल्या.

पत्रकार परिषदेमध्ये हिंदुस्थान-पाकिस्तान तणाबाबत विचारले असता टॅमी ब्रूस म्हणाल्या की, मी यावर भाष्य करणार नाही. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी याआधीच अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिका हिंदुस्थानसोबत असून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. यावेळी त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही केली.

तत्पूर्वी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि शोक व्यक्त केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी अमेरिकेचा हिंदुस्थानला पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हटले. ट्रम्प यांनी स्वत: ट्विट करत याची माहिती दिली होती.

दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध; हिंदुस्थानसोबत ठाम उभे राहणार, जागतिक नेत्यांचे आश्वासन

ट्रम्प यांच्यासह अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनीही पंतप्रधान मोदींना फोन करून जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. या कठीण काळामध्ये अमेरिका हिंदुस्थानी जनतेसोबत उभी असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत अमेरिका हिंदुस्थानसोबत उभी असून सर्वोतोपरी मदत करण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले.

प्रश्न कश्मीरचा नाही, इथे एकही सुरक्षारक्षक नव्हता, हे कसले सरकार? पर्यटकांनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावले