लोअर परळ ते डॉ. आंबेडकर मार्गाला जोडणाऱ्या पुलाचा प्रस्ताव प्रलंबित, आमदार सुनील शिंदेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोअर परळच्या गणपतराव कदम मार्ग जंक्शनपासून सुरू होणाऱ्या आणि लालबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाचे काम कित्येक वर्षांपासून रखडले आहे. या पुलाचे आराखडे केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहेत. एल्फिन्स्टन पूल उद्यापासून (शुक्रवार) बंद होत आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी या प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

ना.म. जोशी मार्ग, गणपतराव कदम मार्ग जंक्शनपासून सुरू होणारा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाला जोडणारा पश्चिम रेल्वे व मध्ये रेल्वेवरून जाणारा तसेच इंडिया युनायडेट मिलमध्ये उतरणाऱ्या पुलाचा प्रकल्प आहे. विकास नियोजन आराखडा 2034मध्ये या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे आराखडे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आले आहेत. पण प्रस्ताव अजून प्रलंबित आहे. तसेच इंडिया युनायटेड मिल येथील जागेच्या भूसंपादनाची प्रक्रियाही झालेली नाही. त्यामुळे मुंबईकरांच्या हितासाठी या मार्गाला आवश्यक मंजुऱ्या मिळण्याच्या दृष्टीने आपण विशेष लक्ष घालून मध्यस्थी करावी आणि कित्येक वर्षे रखडलेल्या या प्रकल्पाला चालना देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सुनील शिंदे यांनी केली आहे.