
मुंबईस्थित टीम आर फॅक्टर 6024 या विद्यार्थ्यांचा रोबोटिक्स टीमने पहिल्या रोबोटिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इंजिनीअरिंग इन्स्पिरेशन अॅवॉर्ड जिंकत एक नवा विक्रम प्रस्थापित केला. अमेरिकेतील ह्युस्टन येथे या प्रतिष्ठेच्या जागतिक स्पर्धेचे आयोजन 16 ते 19 एप्रिलला केले होते. 30 देशांतील 600 हून अधिक टीम्स यात सहभागी होत्या.
अभियांत्रिकी प्रेरणा पुरस्कार हा स्पर्धेतील एक सर्वात प्रतिष्ठत पुरस्कार अशा टीम्सना दिला जातो, ज्या आपल्या शाळा आणि समाजामध्ये अभियांत्रिकी आणि स्टेम (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग, मॅथेमेटिक्स) या विषयांबाबत जनजागृती घडवतात. टीम आर फॅक्टरला हा सन्मान Johnson Division मध्ये मिळाला. टीम आर फॅक्टर ही देशातील पहिली रोबोटिक्स कॉम्पिटिशन टीम असून, त्यांच्या नावावर 6 जागतिक स्पर्धा व 4 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची यशस्वी नोंद आहे. या वर्षीच्या मोसमात ‘द गोल्डफिश’ या नावाच्या रोबोटने त्यांच्या कामगिरीचा केंद्रबिंदू ठरला. संपूर्ण रोबोट डिझाईन, बांधकाम, वायरिंग आणि प्रोग्रामिंग विद्यार्थ्यांनी स्वतः केले.
टीममध्ये 19 विद्यार्थी असून ते मुंबईतीलओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल, पेस कनिष्ठ महाविद्यालय, डीएसबी इंटरनॅशनल स्कूल, पुण्यातील व्हीआयटी, गोवा कॅथेड्रल येथील शारदा मंदिर शाळा आणि जॉन कॉनन, विट्टी, जमनाबाई नरसी, सिंगापूर इंटरनॅशनल स्कूल, एमएसयू प्रीप ग्लोबल अकादमी या शाळांमधील आहेत.