कश्मीरमध्ये अडकलेल्या पालघरमधील पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेना धावली

गोल्डन टेंपल, जालियनवाला बाग,  वैष्णव देवीचे दर्शन घेऊन ते सर्व जण निसर्गसंपन्न पहलगामचा आनंद लुटण्यासाठी निघाले. मात्र कश्मीरमध्ये ढगफुटी झाली आणि सर्वच रस्ते बंद पडले. यामुळे पालघर जिह्यातील 30 जणांचा चमू कटरामध्येच अडकून पडला. यात ज्येष्ठ नागरिकही होते. याबाबत माहिती मिळताच शिवसेना या पर्यटकांच्या मदतीला धावली. कटरा येथून खास लक्झरी बसने या सर्वांना सुखरूपपणे दिल्लीमध्ये आणण्यात आले. तेथे सर्वांची राहण्याची व्यवस्थादेखील केली. संकटात  धावलेल्या शिवसेनेमुळेच आम्ही सुखरूप आहोत, अशी कृतज्ञता या पालघरच्या पर्यटकांनी व्यक्त केली.

पालघर येथील साईश्लोक ट्रव्हलचे भूषण मोरे हे काही ज्येष्ठ महिला व पुरुषांसह 15 एप्रिल रोजी कश्मीर ट्रीपसाठी गेले होते.  कश्मीरमध्ये ढगफुटी होऊन दरडी कोसळल्याने सर्व रस्ते बंद झाले. त्यामुळे पालघरमधील या पर्यटकांची बस उधमपूर येथे रस्त्यावरच अडकली. तेथे असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने  चिरीमिरी घेतल्यानंतर सर्वांना पटनी टॉपसाठी सोडले. मात्र पहलगाम येथे जाण्याच्या तयारीत असतानाच  हल्ल्याची माहिती मिळाली आणि थरकाप उडाला. त्यानंतर सर्व जण पटनी टॉपच्या एका हॉटेलमध्ये अडकून पडले. त्याच वेळी शिवसेना पालघर जिल्हा महिला संपर्कप्रमुख ममता चेंबूरकर यांनी शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर लगेच दिल्लीसाठी आरामदायी बसची व्यवस्था करण्यात आली.

 आणि सर्वांचा जीव भांडय़ात पडला

बसचा खर्च 50 ते 60 हजार असल्याने हा खर्च सर्वांनाच परवडणारा नव्हता. मात्र शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद ठाकूर यांनी लगेच शिवसेना सचिव सूरज चव्हाण यांच्या माध्यमातून भूषण मोरे यांना आर्थिक मदत केली. त्यामुळे सर्वांचाच जीव भांडय़ात पडला. दिल्लीत अरविंद सावंत यांनी राहण्याची व्यवस्थादेखील केली. आमदार अजय चौधरी, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर हेदेखील वेळोवेळी पर्यटकांच्या संपका&त होते.