दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणार –मोदी

पहलगाम हल्ल्यात निष्पापांचे बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठबळ पुरविणाऱ्यांना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा मिळेल, असा इशारा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  पाकिस्तानचे नाव न घेता दिला.

22 एप्रिलला पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्यांमुळे देशभर जनक्षोभ उसळला आहे. त्यावर मोदी बिहारमधील मधुबनी येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रथमच जाहीरपणे व्यक्त झाले. दहशतवाद्यांचे ज्या उरल्यासुरल्या जमिनीवर अस्तित्व उरले आहे, तिथेच त्यांना गाडून टाकण्याची वेळ आली आहे. 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांची पंबर तोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मोदी यांनी दिला. एरवी हिंदीतून संवाद साधणाऱ्या मोदींनी जगाला स्पष्ट संदेश देण्याकरिता इंग्रजी भाषेचा आधार घेतला. ते म्हणाले, अनेकांनी हल्ल्यात आपला मुलगा, भाऊ आणि पती गमावले. हल्ल्यात बळी पडलेले पर्यटक देशाच्या वेगवेगळ्या भागातून आले होते. कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत आमचे दुःख आणि आक्रोश सारखाच आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्यांना न्याय मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आज बिहारच्या जमिनीवरून मी जगाला सांगू इच्छितो, हिंदुस्थान प्रत्येक दहशतवाद्याला शोधून काढेल आणि त्याला टिपून मारेल. त्यांना पाठबळ देणाऱ्यांनाही पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यातून शोधून काढू. हिंदुस्थानींचे स्पिरीट दहशतवाद्यांना मोडून काढता येणार नाही.

या प्रयत्नात संपूर्ण देश ठामपणे उभा राहील. मानवतेवर विश्वास असलेल्या प्रत्येकाची आपल्याला साथ लाभेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दहशतवाद्यांनी मारलेल्या 26 निष्पाप नागरिकांच्या कुटुंबियांच्या पाठीशी देश ठामपणे उभा आहे, असे सांगत त्यांनी व व्यासपीठावरील उपस्थितांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.