
>> प्रभा कुडके
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटक ठार झाल्यानंतर अवघ्या कश्मिरी जनतेच्या मनात एकच सल आहे. आमचे चुकले कुठे? आता कुठे कश्मीरात पर्यटन जोर धरू लागले होते. आता या घटनेनंतर स्थानिक रक्ताचे अश्रू गाळताना दिसत आहेत. सब चले जा रहे है म्हणताना दिसत आहेत.
कश्मीरला जाणाऱ्या फ्लाईट रिकाम्याच दिसत आहेत. कश्मीरमधून पर्यटक केवळ बाहेर कधी जातोय याचाच विचार करताना सध्या दिसत आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर इथला स्थानिक माणूस हतबल झालाय… आता पुन्हा एकदा पोटाची खळगी कशी भरायची हा प्रश्न उभा ठाकलाय.
पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यामुळे स्थानिक बिथरले आहेत. छिन्न आणि सुन्न झालेले स्थानिक केवळ उद्याच्या चिंतेत आहेत. पर्यटकांवर कश्मीरची आर्थिक गणितं बांधलेली असताना आता पर्यटक फिरकले नाहीत तर करायचे काय, हाच प्रश्न प्रत्येक स्थानिकाच्या ओठी आहे. कश्मीरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांपैकी महाराष्ट्रातून सर्वाधिक पर्यटक येत होते. आता मात्र पुन्हा महाराष्ट्रातील येतील की नाही याच वाटेकडे डोळे लागलेत.
आताची एकूण परिस्थिती पाहता श्रीनगरमधील बाजारपेठा या ओस पडल्या आहेत. बहुतांशी अडकलेले पर्यटक परतीचे मार्ग चाचपडत आहेत. श्रीनगर ते मुंबई आणि इतर महत्त्वाच्या शहरांकडे जाण्यासाठी विमान कंपन्यांनी तिकीट दर वाढवल्यामुळे पर्यटकांचा नाइलाज झालेला आहे. अडकलेल्या प्रत्येक पर्यटकाच्या ओठी आता पुन्हा कश्मीर नको हेच वाक्य आहे.
- एरवी गर्दीने ओसंडून वाहणाऱया लाल चौकात केवळ तुरळक गर्दीही फक्त स्थानिकांची दिसून येत आहे.
- श्रीनगरमधील बाजारपेठा या ओस पडल्या आहेत. बहुतांशी अडकलेले पर्यटक परतीचे मार्ग चाचपडत आहेत.
- विमान कंपन्यांनी तिकीट दर वाढवल्याने पर्यटकांची काेंडी झाली.