संक्रमण शिबिरातील रहिवाशांची घरघर संपली, 50 वर्षांनी मिळाले हक्काचे घर; विजेत्यांना आनंदाश्रू

अर्धे आयुष्य संक्रमण शिबिरात गेल्यानंतर तब्बल 40 ते 50 वर्षांनी म्हाडाकडून आता हक्काचे घर मिळाले आहे. त्यामुळे विजेत्यांच्या डोळ्यांतून अक्षरशः आनंदाश्रूच तरळले. म्हाडाने अशाप्रकारेच वर्षानुवर्षे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या संक्रमण शिबिरातील लाभार्थ्यांना घर द्यावे, अशी अपेक्षाही विजेत्यांनी व्यक्त केली.

वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे मास्टर लिस्टवरील 105 पात्र भाडेकरू आणि रहिवासी यांना हक्काच्या घराचे वितरण करण्यासाठी गुरुवारी म्हाडा मुख्यालयात संगणकीय सोडत काढली. 300 ते 750 चौरस फुटाच्या घरांसाठी पाच टप्प्यांमध्ये ही सोडत काढण्यात आली असून माझगाव, प्रभादेवी, माहीम अशा विविध भागांत ही घरे आहेत. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, सचिव नीलिमा धायगुडे, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, उपमुख्य अधिकारी लक्ष्मण मुंडे यांच्यासह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळमजल्यावरील रहिवाशांना दिलासा

मास्टर लिस्टवरील रहिवाशांकडून जास्त क्षेत्रफळाकरिता आकारण्यात येणाऱ्या रेडी रेकनरच्या 110 टक्के रकमेऐवजी 100 टक्के रकमेची आकारण्याचा निर्णय म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी यावेळी जाहीर केला. हा निर्णय डिसेंबर 2023 मध्ये काढलेल्या सोडतीतील पात्र रहिवाशांनादेखील लागू होणार आहे. शिवाय नवीन नियमावलीत तळमजल्यावरील रहिवाशांना पात्र करून मास्टर लिस्टमध्ये त्यांचा समावेश केला जाईल.

धोकादायक उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास रखडलेला असल्यास या इमारतीतील रहिवाशांना मास्टर लिस्टमध्ये येण्याचा पर्याय देणे, रखडलेला पुनर्विकास मार्गी लागण्यासाठी 91 (अ) अंतर्गत नोटीस दिल्यावर म्हाडाने तत्काळ भूसंपादन केलेल्या इमारतीतील रहिवाशांना मास्टर लिस्टमध्ये येण्याचा पर्याय देणे याचाही नवीन नियमावलीत समावेश केला जाणार आहे.

मी 1982 सालापासून कुलाबा कफ परेड संक्रमण शिबिरात राहतोय. तळमजला अस्तित्वात असल्यामुळे तुम्हाला घर मिळणार नाही असे म्हाडाचे पूर्वीचे अधिकारी सांगायचे. यासंदर्भात नियमावली नसल्याचा फटका आम्हाला बसला होता. अखेर आज आम्हाला न्याय मिळाला आहे. त्यासाठी म्हाडाचे आभार, अशी प्रतिक्रिया विजेते गणेश भालेराव यांनी दिली.

कुंभारवाड्यातील आमची बिल्डिंग तोडली तेव्हा याच विभागाच्या आसपास घर मिळेल असे सांगण्यात आले होते, पण 35 वर्षे संक्रमण शिबिरात राहिल्यावर आज आम्हाला घर मिळाले आहे. तेदेखील दुसऱ्याच विभागात. ज्या विभागात बालपण गेले तिथे पुन्हा राहायला जाता येणार नाही याचीही कुठेतरी खंत आहे, अशी भावना विजेती निशा आंबेरकर यांनी व्यक्त केली.