
प्रश्न कश्मीरचा नाही, तर तिथल्या सुरक्षा व्यवस्थेचा आहे. पहलगाममध्ये एकही सुरक्षा रक्षक नव्हता. आमच्या मदतीला कुणीही आले नाही. आमच्या जिवाचे काही मोल आहे की नाही? हे कसलं सरकार आहे? सरकारवर आता आमचा अजिबात विश्वास राहिलेला नाही आणि तुम्ही केवळ तुमचाच विचार करणार असाल तर यापुढे तुम्हाला कुणीही मतदान करणार नाही, असे खडे बोल पहलगाममध्ये मृत पावलेले सुरतचे शैलेश कलाथिया यांच्या पत्नी शीतल यांनी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांना सुनावले.
सुरतमधील शैलेश कलाथिया मुंबईतील स्टेट बँकेच्या शाखेत मॅनेजर होते. पत्नी-मुलांसह पहलगाममध्ये गेलेल्या शैलेश यांचा दहशतवादी हल्ल्यात बळी गेला. त्यांच्यावर आज सुरत येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सी. आर. पाटील उपस्थित होते. त्यांना शीतल यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. शीतल यांना पाटील यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर नाही साहेब, तुम्हाला ऐकावंच लागेल. सगळं झालं की सरकार येतं. फोटो काढतात आणि निघून जातात. नंतर काहीच होत नाही. मला न्याय हवा आहे. केवळ माझ्या पतीसाठी नाही, तर तिथे प्राण गमावलेल्या प्रत्येकासाठी न्याय हवा आहे, असा संताप शीतल यांनी व्यक्त केला.
पहलगामध्ये हल्ला झाला तेव्हा सैन्य नव्हते, पोलीसही नव्हते. मी मदतीसाठी ओरडत राहिले, पण मदत मिळाली नाही. इतके मोठे पर्यटन स्थळ असून तेथे वैद्यकीय शिबीर नव्हते. तुम्ही लोक जनतेच्या करांच्या पैशातून हेलिकॉप्टरमधून प्रवास करता. तुमच्या जिवाला महत्त्व आहे, मग करदात्यांच्या जिवाचे काहीच मोल नाही का, असा संताप शीतलबेन यांनी व्यक्त केला.
मुलांसाठी पाहिलेली स्वप्नं कशी पूर्ण करू?
मुलांकडे बोट दाखवत, या मुलांचे भवितव्य काय आहे. मला मुलाला इंजिनीअर आणि मुलीला डॉक्टर बनवायचे आहे. माझा आधारस्तंभ गेला. आम्ही मुलांसाठी बाळगलेलं स्वप्न कसं पूर्ण करायचं ते सांगा, असा आर्त सवालही शीतल यांनी केला.