मुंबईतील हजारो रिक्षा-टॅक्सींची मीटर रिकॅलिब्रेशनकडे पाठ, मनमानी भाडे आकारणीला चाप बसणार की नाही?

<<< मंगेश मोरे >>>

राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) दिलेली डेडलाईन संपायला केवळ पाच दिवस बाकी असताना मुंबईतील हजारो रिक्षा, टॅक्सींनी अद्याप मीटर रिकॅलिब्रेशन केलेले नाही. 90 दिवसांची मुदत मिळूनही जेमतेम 60 टक्के रिक्षा-टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. अनेक रिक्षा-टॅक्सीचालक मनमानी भाडे आकारत आहेत. प्रवाशांची ही लूट थांबवण्यासाठी आरटीओने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील मीटर रिक्षा-टॅक्सींच्या दरात 1 फेब्रुवारीपासून तीन रुपयांची वाढ लागू करण्यात आली. यासाठी ताडदेव, वडाळा आणि अंधेरी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 1 लाख 32 हजार 939 रिक्षांपैकी 82,550 रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे, तर 39,094 टॅक्सींपैकी 23,289 टॅक्सींचे मीटर रिकॅलिब्रेशन करण्यात आले आहे. 30 एप्रिलपर्यंत मीटर रिकॅलिब्रेशन न करणाऱ्या रिक्षा व टॅक्सीचालकांकडून आरटीओ प्रत्येक दिवशी 50 रुपयांचा दंड आकारणार आहे. या दंड आकारणीला पाच हजार रुपयांपर्यंतची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. तरीदेखील रिक्षाचालक याकडे दुर्लक्ष करीत आहेत.

आरटीओनिहाय सद्यस्थिती

ताडदेव

एकूण टॅक्सी – 27,237
रिकॅलिब्रेशन पूर्ण – 17,107
रिकॅलिब्रेशन बाकी – 10,130

वडाळा

एकूण रिक्षा – 74,893
एकूण टॅक्सी – 8,255
रिक्षा रिकॅलिब्रेशन पूर्ण – 45,449
टॅक्सी रिकॅलिब्रेशन पूर्ण – 4,117

अंधेरी

एकूण रिक्षा – 58,046
एकूण टॅक्सी – 3,602
रिक्षा रिकॅलिब्रेशन पूर्ण – 37,101
टॅक्सी रिकॅलिब्रेशन पूर्ण – 2,065

मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण करण्यासाठी आवाहन केले जात आहे. अद्याप रिकॅलिब्रेशन करू न शकलेल्या रिक्षांची संख्या विचारात घेऊन रिकॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ देण्याची विनंती आरटीओला करणार आहोत, असे मुंबई रिक्षा मेन्स युनियनचे थंपी कुरियन यांनी सांगितले.