सांप्रदायिक कट्टरपणा असला तरी सर्वांनी मिळून चाललं पाहिजे! मोहन भागवत यांचे प्रतिपादन

प्रत्येकाची निष्ठा किंवा पंथ वा सांप्रदाय वेगळे असू शकतात. प्रत्येक सांप्रदायात थोडाफार कट्टरपणा असतो. असं असलं तरी सगळ्यांनी मिळून चाललं पाहिजे. कारण अनुशासन हाच धर्म आहे. धर्माचे मूळ आपलेपणा आहे. आपलेपणाची कास धरून पुढे चालूया. तसे झाले तर देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. आपलेपणाची दृष्टी म्हणजे गुणगौरवाची दृष्टी. गुणगौरवाचा मंगेशकर कुटुंबीयांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे भागवत म्हणाले.

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण मोहन भागवत यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात गुरुवारी हा पुरस्कार सोहळा रंगला. यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना आज प्रदान करण्यात आला. मोहन भागवत यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना खडीकर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार, पंडित हृदयनाथ मंगेशकर, हृदयेश आर्ट्सचे अविनाश प्रभावळकर आदी उपस्थित होते. यावेळी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संकल्पनेतील ‘सारं काही अभिजात’ कार्यक्रम सादर झाला.

सन्मानाचे मानकरी

दिग्गज व्हायोलिन वादक डॉ. एन. राजम, अभिनेते सचिन पिळगावकर, सुनील शेट्टी, शरद पोंक्षे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गायिका रीवा राठोड यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘असेन मी नसेन मी’ला सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून मोहन वाघ पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. अभिनेत्री अमृता सुभाष हिने हा पुरस्कार स्वीकारला. साहित्य क्षेत्रासाठी श्रीपाल सबनीस यांना ‘वाग्विलासिनी पुरस्कार’ देण्यात आला. ‘आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अॅण्ड स्लो लर्नर चिल्ड्रन’ या सामाजिक संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अंबिका टाकळकर यांनी पुरस्कार स्वीकारला.