
राष्ट्रावर संकट आले आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकार जी भूमिका घेईल किंवा जो निर्णय घेईल, त्याच्या पाठिशी आम्ही ठामपणे उभे आहोत, अशी स्पष्ट भूमिका आज शिवसेनेने मांडली.
संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा– संजय राऊत
कश्मीर प्रश्न, देशाची सुरक्षा याबाबत आमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. मात्र, आता प्रश्न, शंका उपस्थित करण्याची वेळ नसून देश एक आहे, हे दाखवण्याची गरज आहे. त्यामुळेच सरकार जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. कश्मीर मुद्दय़ावर संसदेत सविस्तर चर्चा होण्याची गरज आहे. त्यासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्याची आवश्यकता असेल तर ते पाऊल उचलले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. सरकार नेहमीच शत्रूला घुसून मारू असं सांगतं मग त्याचा विचार करा. भले आम्हाला कल्पना देऊ नका, असेही राऊत यांनी नमूद केले.
दहशतवाद्यांना कडक उत्तर द्या– अरविंद सावंत
शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांना आज पत्र लिहिले. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली. त्या बैठकीत शिवसेनेच्या गटनेत्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स लाईनद्वारे उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती त्यांनी त्या पत्रात केली. संजय राऊत आणि आपण दोघेही देशाच्या वेगवेगळ्या दुर्गम भागात संसदीय स्थायी समितीच्या शिष्टमंडळात आहोत. त्यामुळे वेळेवर दिल्लीला पोहोचू शकत नाही आणि फक्त सभागृहातील नेत्यांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. सरकार दहशतवाद्यांना आणि त्यांच्या आश्रयदात्यांना इतके कडक उत्तर देईल की ते पुन्हा कधीही आपल्या नागरिकाला स्पर्श करण्याचा विचार करणार नाहीत, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.