
सचिन तेंडुलकरचा मुलगा या दबावाखाली आजही चाचपडत असलेल्या अर्जुनला आयपीएलमध्ये अजूनही अपेक्षित संधी मिळालेली नाही. मात्र अर्जुनने आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले तर तो भावी ख्रिस गेल बनू शकतो, अशी भविष्यवाणी खुद्द युवराज सिंगचे वडील यांनी वर्तवली आहे.
क्रिकेटमध्ये अर्जुनला अद्याप यशाचे शिवधनुष्य पेलता आलेले नाही. त्याच्यातील गुणांना चमकवण्याची जबाबदारी योगराज सिंग यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची अर्जुनच्या खेळावर तीक्ष्ण नजर आहे. त्यांनी एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अर्जुनने आपल्या गोलंदाजीपेक्षा आपल्या फलंदाजीवर अधिक लक्ष द्यायला हवे, असा सल्ला दिला आहे. जर युवराज केवळ तीन महिन्यांसाठी अर्जुनला आपल्या तालमीत घेतो तर तो क्रिकेटचा भावी गेल ठरेल. माझ्या मते सचिनने एका वर्षासाठी अर्जुनला युवीच्या हातात द्यायला हवे. मी हेच युवराजलाही सांगितले आहे. अर्जुनची फलंदाजीही खूप चांगली आहे. त्यामुळेच त्याने रणजी पदार्पणातच शतकी खेळी केली होती. आताही त्याला फलंदाजीलाच प्राधान्य द्यायला हवे, असे योगराज म्हणाले.