
अत्यंत पारदर्शी आणि प्रामाणिकपणे महाराष्ट्र राज्य लॉटरी सरकारच्या वतीने चालवली जाते, मात्र एवढे असून महाराष्ट्र राज्य लॉटरीला लोकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ही लॉटरी इतर राज्यांच्या लॉटरीच्या तुलनेत मागे पडली आहे. त्यासाठी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या ड्रॉच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेचे अध्यक्ष मनोज वारंग यांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीचे उपसंचालक अनंतकुमार जोशी यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र राज्य लॉटरीला गेल्या 55 वर्षांची गौरवशाली व विश्वासार्ह परंपरा आहे. मुंबईसह राज्यभरात या लॉटरीवर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र गेल्या काही वर्षांत अत्यंत पारदर्शी असलेली ही लॉटरी इतर राज्यांच्या तुलनेत मागे पडली आहे. इतर राज्यांनी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत पुढे मुसंडी मारली आहे. महाराष्ट्र राज्य लॉटरीपेक्षा इतर राज्यांचा लॉटरीचा सर्वात जास्त खप आपल्या राज्यात होता. यासाठी सरकारने लॉटरीच्या विक्रीत वाढ होण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या पाहिजे. त्यापैकी इतर राज्य दिवसाला 24 ड्रॉ काढते, पण महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या केवळ 4 ड्रॉ होतात. त्यामुळे राज्य लॉटरीच्या ड्रॉची संख्या वाढवावी तसेच नव्या तंत्रज्ञानाचा वापर करावा, राज्य लॉटरीची आकर्षक जाहिरातबाजी टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडियात करावी, राज्य लॉटरीने स्वतःची ऑनलाईन लॉटरी सुरू करावी आणि परराज्यातील लॉटरीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शिवसेना लॉटरी विक्रेता सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.