
आयपीएलच्या एका महिन्याच्या खेळात सर्वात जबरदस्त खेळ केला आहे तो गुजरात टायटन्सने. त्यांनी आठ सामन्यांच्या आपल्या खेळात सहा विजयांसह केवळ अव्वल स्थानच कायम राखले नसून त्यांच्याच साई सुदर्शनने ‘ऑरेंज कॅप’ तर प्रसिध कृष्णाने ‘पर्पल कॅप’वर आपला कब्जा करत आयपीएलमध्ये अनोखे थ्री चिअर्स केले आहे. आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात तिन्ही आघाडय़ांवर एकाच संघाचे वर्चस्व प्रथमच दिसले आहे.
अहमदाबाद मूळ असलेल्या गुजरात टायटन्सने 2022 साली आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्याने आपल्या पदार्पणातच आयपीएल विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला. हा पराक्रम केवळ आयपीएलच्या पहिल्या मोसमात राजस्थान रॉयल्सला जमला होता. त्यानंतर 2023 च्या आयपीएलमध्येही गुजरातने अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला, पण चेन्नईने त्यांना सलग जेतेपद जिंकण्याचा पराक्रम रचू दिला नाही. पहिल्या दोन स्पर्धांत धडाकेबाज यश संपादल्यानंतर गेला मोसम गुजरातसाठी फारच वाईट गेला होता. या मोसमात ते साखळीतच गारद झाले होते आणि गेल्या दोन्ही मोसमात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला हा संघ गेल्या मोसमात आठव्या स्थानी राहिला. गेल्या मोसमात गुजरातची कामगिरी फारच खालावली होती, मात्र यंदा त्यांनी जोरदार मुसंडी मारत आपले खेळरंग अवघ्या क्रिकेट विश्वाला दाखवले आहे.
पूरन-नूरला मागे टाकले
आयपीएलच्या पहिल्या आठवडय़ापासून फलंदाजीत लखनौच्या निकोलस पूरनने जे अव्वल स्थान पटकावले तर तब्बल चार आठवडे त्याच्याच नावावर कायम होते. तसेच गोलंदाजीतही चेन्नईच्या नूर अहमदने आपले अव्वल स्थान कुणालाही हिसकावू दिले नव्हते. मात्र साई सुदर्शनने आपल्या फलंदाजीतील सातत्य कायम राखताना पाचवे अर्धशतक झळकावत पूरनच्या डोक्यावर महिनाभर असलेली ‘ऑरेंज कॅप’ हिसकावून घेतली. त्याच्यासोबत प्रसिध कृष्णानेही दिल्लीविरुद्धच्या सामन्यात 41 धावांत 4 विकेट घेत प्रथमच नूर अहमदला गाठले आणि मग कोलकात्याविरुद्धही 2 विकेट घेत आपल्या विकेटची संख्या 16 वर नेली. आता काही दिवस गुजरातचे फलंदाज आणि गोलंदाज अव्वल स्थानी कायम राहतील, हे निश्चित आहे. एवढेच नव्हे तर जोस बटलर आणि शुभमन गिलची बॅटसुद्धा जोरात असल्यामुळे तेसुद्धा अव्वल स्थानाच्या शर्यतीत फार मागे नाहीत. गोलंदाजीतही प्रसिधसह साई किशोर, मोहम्मद सिराजसुद्धा आघाडीवर आहेत. त्यामुळे फलंदाजी आणि गोलंदाजीत गुजरातचे कुणीही अव्वल स्थान पटकावू शकतात. मात्र संघाच्या गुणतालिकेत दिल्लीपाठोपाठ मुंबई, बंगळुरू, पंजाब आणि लखनौ हे चार संघ एक विजय मागे असल्यामुळे गुजरातला पहिला नंबर राखण्यासाठी विजयाशिवाय पर्याय नाही.
गुजरातची पराभवाने सलामी
गुजरातला आयपीएलच्या आपल्या सलामीच्या सामन्यात पंजाबविरुद्ध संघर्षपूर्ण सामन्यात 11 धावांनी हार सहन करावी लागली होती, मात्र यानंतर सलग विजयाचा चौकार खेचत त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले. विशेष म्हणजे अव्वल स्थान पटकावण्यासाठी त्यांना दिल्लीशी कांटे की टक्कर द्यावी लागत आहे. दोघांचे गुण आणि विजय समान असल्यामुळे नेट रनरेटच्या आधारेच अव्वल स्थानाचा फैसला लागतोय. यात कधी गुजरात तर कधी दिल्ली पहिला नंबर राखतोय. आठपैकी सहा सामने जिंकल्यामुळे त्यांचा प्ले ऑफ प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे.