
महायुती सरकार मधील मंत्री, खासदार सगळ्यांनी जबाबदारीचे भान सोडले आहे. किमान अशा घटनांमध्ये तरी स्वतःचे मार्केटिंग करणे सोडा, असं म्हणत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातील पर्यटकांना धीर देण्याबरोबरच तेथून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने श्रीनगरला पाठवले होते. असे असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कश्मीर दौऱ्यावर रवाना झाले होते. दहशतवादी हल्ल्यातही महायुतीतील मंत्र्यांची आणि नेत्यांची श्रेयासाठी धडपड सुरू आहे. यातच मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी अत्यंत असवंदेनशील वक्तव्य केलं आहे. “जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानानं आणलं आहे”, असं विधान नरेश म्हस्के यांनी केलं आहे. यावरूनच X वर एक पोस्ट करत वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
X वर पोस्ट करत विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, “महायुती सरकार मधील नेत्यांमध्ये श्रेयवादाची आणि स्वतःच्या मार्केटिंगची स्पर्धा किती असावी? जे कधी विमानात बसले नाही त्यांना पण एकनाथ शिंदे यांनी विमान प्रवास घडवून आणला. ही वेळ काय, कोणी कधी कसले श्रेय घ्यायचे याचे भान राहिले नाही का? पर्यटकांना सुखरूप आणणे महत्वाचे की विमान प्रवास? आणि ते केलं म्हणून पण श्रेय घ्यायचे?”
ते म्हणाले, “पहलगाममध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा मृत्यू झाला, काही जखमी झाले. काही अडकले आहे. त्यांना धीर देण्यापेक्षा सगळ्यात आधी तिथे कोण पोहचत, याची स्पर्धा झाली. गरज नसताना उपमुख्यमंत्री यांनी कश्मीर वारी केली. इथवर न थांबता तुम्ही कसे गेले, कशी मदत केली याचे गोडवे गाण्यासाठी शिंदे सेनेचे खासदार पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पर्यटकांवर किती उपकार केले अशी भाषा करतात? महायुती सरकार मधील मंत्री, खासदार सगळ्यांनी जबाबदारीचे भान सोडले आहे. किमान अशा घटनांमध्ये तरी स्वतःचे मार्केटिंग करणे सोडा.”