
मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनापूर परिसरात बुधवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएमआरडीकडून मेट्रोसाठी हा खड्डा खणण्यात आला होता. आर्यन विश्वनाथ निषाद हा या खड्ड्याजवळ खेळत होता. खेळता खेळता तो खड्ड्यात पडला. खड्डा पाण्याने भरलेला असल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलाला पाण्यातून बाहेर काढले. आर्यनला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मानखुर्द पोलीस घटनेची चौकशी करत आहेत. चौकशीअंती संबंधितांवर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.