हिंदुस्थानी जवानाने चुकून सीमा ओलांडली, पाकिस्तानने घेतलं ताब्यात

जम्मू आणि कश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान पंजाबमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. फिरोजपूरमधील हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानाने चुकून सीमा ओलांडली. या बीएसएफ जवानाला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं आहे. पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलेल्या हिंदुस्थानी जवानाचे नाव पूनम कुमार असल्याचं सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बीएसएफचे जवान पूनम कुमार सीमेजवळील काटेरी तारेच्या पलीकडे पिके कापणाऱ्या शेतकऱ्यांवर लक्ष ठेवून होते. पाळत ठेवताना उष्णतेमुळे जवान पूनम कुमार चुकून शून्य रेषा ओलांडून पाकिस्तानच्या सीमेत झाडाच्या सावलीत बसण्यासाठी गेले. जिथे पाकिस्तानी सैन्याने त्यांना पाहिले आणि ताब्यात घेतले. ही बातमी मिळताच बीएसएफचे वरिष्ठ अधिकारी सीमेवर पोहोचले. सैनिकाची सुटका करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य आणि बीएसएफ अधिकाऱ्यांमध्ये बैठक सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.