सिग्नल लाल असताना जाऊ दिले नाही, नशेबाज कार चालकाने दुचाकीला दिली धडक; दोघे गंभीर जखमी

सिग्नल तोडून पुढे गेला नाही, म्हणून एका नशेबाज कार चालकाने पाठलाग करून एका दुचाकीस्वाराला धडक देत ठार मारण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वाराच्या हेल्मेटमधील कॅमेर्‍यात हा थरार कैद झाला आहे. कारच्या जोरदार धडकेमध्ये दुचाकी चालक आणि पाठीमागे बसलेला एकजण हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कार चालकाला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

नाशिकच्या छत्रपती संभाजी महाराज चौकात राहणारा प्रेम प्रफुल्ल बोंडे हा रविवारी रात्री नऊच्या सुमारास दुचाकीने त्र्यंबक रोडवरून जात होता. पाठीमागे त्याचा मामेभाऊ आर्यन पाटील बसलेला होता. सिबल हॉटेल सिग्नल लाल असल्याने तो थांबला. त्याच्या पाठीमागे असलेल्या एमएच 15 जेए 5558 या सेल्टॉस कार चालकाने हॉर्न वाजवून सिग्नल तोडून दुचाकी पुढे नेण्याचा इशारा केला. बोंडे याने सिग्नल तोडण्यास नकार दिला. हिरवा सिग्नल सुरू झाल्यानंतर तो त्र्यंबक रोडने पुढे निघाला. आपले न ऐकल्याचा राग आल्याने त्या कार चालकाने दुचाकीचा वेगात पाठलाग सुरू केला, धडक देवून पाडण्याचा प्रयत्न केला, हे लक्षात येताच दुचाकीचा वेग वाढवित बोंडे याने जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. एबीबी सर्कलहून सिटी सेंटर मॉल सिग्नलला वळसा घालून पुन्हा एबीबी सर्कलकडे जात असताना या कार चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली, काही फूट लांब फरफटत नेले. यात आर्यनच्या डोक्याला, तर प्रेम बोंडे याच्या पायाला व पाठीला गंभीर दुखापत झाली. कारचे बंपर, नंबर प्लेट तुटून रस्त्यावर पडले. कार चालक फरार झाला. कार किया शोरूमला लावून तो घरी दडून बसला.

जखमी तरुणांना नातलगांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. गंगापूर पोलिसात धाव घेतली. नंबरप्लेटचे तुटलेले तुकडे जुळवून कार चालकाचा शोध घेण्यात आला. खडकाळी भागातील रहिवाशी शेख शाहरूख शेख या कार चालकाला अटक करण्यात आली. कार अंगावर घालून दोघांना ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच प्रकारचा गुन्हा केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. हा कार चालक नशेबाज असून, तो सराईत गुन्हेगार आहे. व्याजासह नशेचे पदार्थ विक्रीच्या अवैध व्यवसायाशी त्याचा संबंध आहे का, या दिशेने पोलीस तपास सुरू आहे.