
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच मधुमबनीमध्ये जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी, त्यांनी व्यासपीठावरून जगाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, हिंदुस्थान कोणत्याही परिस्थितीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आता दहशतवादाविरोधातील अंतिम आणि निर्णायक लढाईची वेळ आली आहे. आता दहशचवाद्यांची शिल्ल्क असलेली आश्रयस्थानेही उद्धवस्त करण्याची वेळ आली आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांना आणि त्याच्या सूत्रधारांना आम्ही अद्दल घडवणार आहेत. तसेच त्यांना कोणी विचारही करू शकणार नाही, अशी शिक्षा देण्यात येईल, असा इशाराही मोदी यांनी दिला आहे.
भाषण सुरू करण्यापूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली. हा हल्ला केवळ नि:शस्त्र पर्यटकांवर नव्हता, तर देशाच्या शत्रूंनी देशाच्या आत्म्यावर हल्ला केला आहे. आता दहशतवाद्यांची शिल्लक असलेली आश्रयस्थाने उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे. आम्ही दहशतवाद्यांना पाताळातूनही शोधून काढू आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा करू, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून घेणार नाही. हिंदुस्थानचे शत्रू कुठेही असले तरी, ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कुठेही लपले तरी त्यांना शोधून काढले जाईल आणि अद्दल घडवण्यात येईल.
या हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. हिंदुस्थानने सिंधू पाणी करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी राजदूतांना परत पाठवण्याचा आणि अटारी-वाघा सीमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या लोकांचे व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आले आहेत. तसेच हिंदुस्थानात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आता पंतप्रधान मोदी यांनी आता दहशतवादाविरोधातील अंतिम आणि निर्णायक लढाईची वेळ आली आहे, असे सप्ष्ट करत दहशतवादाचा खात्मा करण्याचा निर्धार जगासमोर व्यक्त केला आहे.