Pahalgam Terror Attack – पाकिस्तानच्या बदल्याआधी मोदी, शहांचा राजीनामा मागा! भाजप नेत्याचा घरचा अहेर

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना नाव, धर्म विचारून गोळ्या घातल्या. यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचाही समावेश आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. केंद्र सरकारकडूनही याबाबत पावलं उचलली जात असतानाच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्ला चढवला आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी याआधीही मोदी सरकारच्या अनेक धोरणांविरुद्ध सडेतोड भूमिका मांडली आहे. आताही पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून मोदी, शहा या जोडगोळीवर हल्ला चढवला आहे. ‘पाकिस्तानच्या बदल्याआधी मोदी, शहा यांचा राजीनामा मागा. चीन, पाकिस्तान, मालदीव, बांगलादेश प्रसंगी त्यांची अनेकदा परीक्षा झाली असून प्रत्येकवेळी दोघांनी शरणागती पत्करत भारतमातेला अपमानित केले आहे’, असा हल्लाबोल स्वामी यांनी केला.