अखेर एल्फिन्स्टन उड्डाणपूल शुक्रवारी रात्रीपासून बंद, वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था

आज बंद होणार, उद्या बंद होणार… या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. परळ पूर्व आणि प्रभादेवी पश्चिमेला जोडणारा 100 वर्षे जुना एल्फिन्स्टन उड्डाणपूल अखेर शुक्रवार, 25 एप्रिलच्या रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी बंद होणार आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी याबाबतची अधिसूचना आज जारी केली. शिवाय वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते असणार त्याबाबतही स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद होणार अशी चर्चा रंगली होती. परंतु हा उड्डाणपूल बंद केल्यास नागरिक, विद्यार्थी, रुग्ण व नोकरदार वर्गांची मोठी पुंचबणा होईल, त्यामुळे पर्याय द्या मगच हा उड्डाणपूल बंद करा असा आवाज शिवसेनेसह सर्व नागरिकांनी उठवला होता. त्यामुळे त्याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी 8 एप्रिल रोजी एका अधिसूचनेद्वारे उड्डाणपूल बंद करण्याच्या अनुषंगाने नागरिकांच्या 13 एप्रिलपर्यंत सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार आलेल्या नागरिकांच्या सूचनांचा विचार करून वाहतूक व्यवस्थापनाचे नियोजन केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी 25 एप्रिलच्या रात्री 9 वाजल्यापासून एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेतला.

रुग्णवाहिकेची व्यवस्था

परळ व प्रभादेवी परिसरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णालयात जाण्या-येण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण विभागामार्फत दोन रुग्णवाहिकांची सुविधा करण्यात आलेली असून एक रुग्णवाहिका प्रभादेवी रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वे पादचारी पूल येथे व दुसरी रुग्णवाहिका परळ रेल्वे स्थानक पूर्व येथे उपलब्ध असेल. तसेच सदर रुग्णवाहिकेसोबत रुग्णांकरिता व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

पर्यायी वाहतूक व्यवस्था

पूर्वकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी

– दादर पूर्वकडून दादर पश्चिमकडे व दादर मार्पेटकडे जाणाऱया वाहनांनी टिळक ब्रिजचा वापर करावा.
– परेल पूर्वकडून प्रभादेवी व लोअर परेलला जाणारे वाहनचालक हे करी रोड ब्रिजचा वापर करतील. (सकाळी 7:00 वा. ते दुपारी 3:00 वा. पर्यंत),
– परेल, भायखळा पूर्वकडून प्रभादेवी, वरळी, कोस्टल रोड व सी लिंकच्या दिशेने जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.

पश्चिमेकडून पूर्वकडे जाण्यासाठी

– दादर पश्चिमेकडून दादर पूर्वकडे जाणारे वाहनचालक हे टिळक ब्रिजचा वापर करतील.
– प्रभादेवी व लोअर परेल पश्चिमेकडून परळ, टाटा रुग्णालय व केईएम रुग्णालय येथे जाणारे वाहनचालक हे करी रोड ब्रिजचा वापर करतील. (दुपारी 3:00 वा. ते रात्री 11:00 वा. पर्यंत).
– कोस्टल रोड व सी लिंकने व प्रभादेवी, वरळीकडून परेल, भायखळा पूर्वकडे जाणारे वाहनचालक हे चिंचपोकळी ब्रिजचा वापर करतील.