अत्तर्डेने शेवटच्या चेंडूवर ठोकला जेतेपदाचा षटकार, तल्यारखान चषकावर एमसीए कोल्ट्सचे नाव

शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना शशांक अत्तर्डेने शम्स मुलानीला षटकार खेचत एमसीए कोल्ट्सला आरएफएस तल्यारखान स्मृती टी-20 स्पर्धेच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अत्यंत चुरशीच्या अंतिम फेरीत त्यांनी पारसी जिमखाना संघावर 2 विकेट राखून विजय मिळवला. पारसी जिमखान्याच्या 175 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सिल्वेस्टर डिसोझा, झैद पाटणकर आणि आयुष वर्तकच्या (प्रत्येकी 2 विकेट) प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर एमसीए कोल्ट्सचा निम्मा संघ 90 धावांत माघारी परतला होता. तेव्हा सिद्धार्थ आक्रे (35 धावा) आणि अथर्व अंकोलेकरने (31 धावा) सहाव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी करून आव्हान कायम ठेवले. त्यानंतर अंकोलेकर आणि शशांक अत्तर्डेने (नाबाद 25 धावा) आठव्या विकेटसाठी 32 धावा जोडताना संघाला विजयासमीप आणले. शेवटच्या तीन षटकांमध्ये 30 धावांची गरज असताना अत्तर्डेने फटकेबाजी करताना सामना एमसीए कोल्ट्सच्या बाजूने झुकविला.