
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातील पर्यटकांना धीर देण्याबरोबरच तेथून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी महायुती सरकारच्या नेत्यांत स्पर्धा लागली आहे. पळा पळा कोण पुढे पळे अशीच काहीशी अवस्था मिंधे गटाची झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने श्रीनगरला पाठवले आहे. त्यानंतरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कश्मीर दौऱ्यावर रवाना झाले. दहशतवादी हल्ल्यातही शिंदेंची श्रेयासाठी धडपड सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृत्यू झाला तर काही जखमी आहेत. राज्यातील शेकडो पर्यटक कश्मीरमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी मंत्री गिरीश महाजन यांना श्रीनगरला पाठविण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यानंतरही उपमुख्यमंत्री शिंदे विशेष विमानाने जम्मू–कश्मीरला गेले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून आधीच मदतकार्य सुरू झालेले असताना शिंदेंचा कश्मीर दौरा कशासाठी असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
- मुख्यमंत्री फडणवीस स्वतः कश्मीरमधील प्रशासनाशी संपर्क साधून राज्यातील पर्यटकांची काळजी घेत आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी समन्वय साधून कश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी विशेष रेल्वेची तसेच विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
- मुंबई विमानतळावर समन्वय साधण्यासाठी मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा. तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोपवली आहे. शिंदे गटाकडून गृह राज्यमंत्री योगेश कदम विमानतळावर उपस्थित होते. शिंदे गटाची एक टीम श्रीनगरलादेखील पोहचली आहे.
अजित पवारांचा कश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना फोन
अजित पवार यांनी पह्नवरून जम्मू आणि कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणून त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे.