
सहकुटुंब एकत्र कश्मीरचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या डोंबिवलीतील अतुल मोने, हेमंत जोशी आणि संजय लेले या तीन मावस भावंडांची दहशतवाद्यांनी क्रूर हत्या केली. या घटनेने अवघे शहर शोकसागरात बुडाले. दहशतवाद्यांविरोधात प्रचंड संताप उसळला. या तिघांचेही पार्थिव बुधवारी सायंकाळी उशिरा अंत्यदर्शनासाठी पश्चिमेकडील भागशाळा मैदानावर आणले तेव्हा एकच आकांत उसळला. कुटुंबीयांच्या आक्रोशाने अवघे वातावरण शोकविव्हल झाले. हे तिघेही भाऊ एकत्र अनंताच्या प्रवासाला निघाले तेव्हा हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या डोंबिवलीकरांना हुंदके अनावर झाले.
आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास या तिघांचेही पार्थिव एकत्र डोंबिवलीच्या भागशाळा मैदानावर आणण्यात आले. त्याआधीच तेथे मोने, जोशी आणि लेले कुटुंबीय, आप्तेष्ट, मित्रमंडळी तसेच हजारो नागरिक उपस्थित हेते. अतुल मोने यांची पत्नी अनुष्का, मुलगी ऋचा, हेमंत जोशी यांची पत्नी मोनिका, मुलगा ध्रुव, संजय लेले यांची पत्नी कविता आणि मुलगा हर्षल यांच्या हृदय चिरणाऱया आक्रोशाने अवघे भागशाळा मैदान शोकाकूल झाले. त्यांचे सांत्वन करणाऱयांच्याही अश्रूंचा बांध फुटत होता. रात्री या तिघांचेही पार्थिव एकत्र अखेरच्या प्रवासाला निघाले तेव्हा उपस्थितांच्या डोळय़ांत पूर दाटला होता.
आज डोंबिवली बंद
पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या निर्घृण हल्ल्याचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी डोंबिवली बंदची सर्वपक्षीय हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सर्व देशभक्तांनी सामील होऊन पाकिस्तानचा धिक्कार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.