Pahalgam Terror Attack – श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकीट तिप्पट, विमान कंपन्यांवर भडकले नेटकरी, सरकारने घेतली दखल

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भयभीत झालेले पर्यटक कश्मीर खोऱ्यातून आपल्या घरी परतायला गर्दी करत आहेत. त्यामुळे विमान तिकीट आणि रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. अशातच विमान कंपन्यांनी आज तिकिटांचे दर तिपटीने वाढवले. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने याची दखल घेऊन देशभरातील एअरलाईन्सना तिकीट दर न वाढवण्याचे निर्देश दिले. तसेच श्रीनगरहून देशभरात विमानांचे उड्डाण वाढवावे, तिकीट कॅन्सल चार्जेस आणि रिशेडय़ुलिंग चार्ज घेऊ नये, असे आदेश दिले.

पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरहून मुंबई जाण्यासाठी असणाऱया तिकिटांचे दर वाढविण्यात आल्याचे काही युजर्संने सोशल मीडियावर शेअर केले. श्रीनगर ते कोलकाता विमानाचे तिकीट 32 हजार रुपयांपर्यंत वाढवल्याचे एका ट्विटर युजर्सने तिकिटाचा पह्टो शेअर करत सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर विमान कंपन्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त झाला.

अतिरिक्त चार उड्डाणे

सरकारच्या आदेशानंतर एअर इंडिया आणि इंडिगो कंपनीने श्रीनगरहून उड्डाण करणाऱया चार विमानांची संख्या वाढवली. त्यातील दोन विमाने ही दिल्लीसाठी असून दोन मुंबईसाठी वाढविण्यात आली.