Pahalgam Terror Attack – पहलगाम हल्ल्यावर सेलिब्रेटींनी व्यक्त केला तीव्र संताप

पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. अनेक सेलेब्रिटींनी याबद्दल दुःख आणि संताप व्यक्त केला. यामध्ये ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, शाहरुख खान, अजय देवगण, आलिया भट्ट, कतरिना पैफ, दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन, राम चरण, अल्लू अर्जुन, विकी कौशल, रणदीप हुड्डा, विवेक ओबेरॉय, फरहान अख्तर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि इतर अनेक सेलेब्रिटींचा समावेश आहे.

शाहरुख खानने ट्विटरवर लिहिले की, ‘पहलगाममध्ये घडलेल्या विश्वासघातकी आणि अमानवी हिंसक घटनेमुळे होणारं दुःख आणि राग शब्दांत व्यक्त करता येत नाही. अशा काळात आपण केवळ देवाकडे त्या पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो आणि आपल्या अंतःकरणातून शोक व्यक्त करू शकतो. हे दुःखद प्रसंग झेलणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी माझ्या मनापासून संवेदना आहेत. एक राष्ट्र म्हणून आपण सर्वजण एकत्र, बळकट उभे राहू आणि या अमानवी कृत्याविरुद्ध न्याय मिळवू.’

फवाद खानच्या चित्रपटाला विरोध

पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि वाणी कपूरचा ‘अबीर गुलाल’ हा चित्रपट येत्या 9 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर हा चित्रपट बॅन करण्याची मागणी होत आहे. इंडियन फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पंडित यांनी ‘अबीर गुलाल’च्या प्रदर्शनाला विरोध दर्शवला.