
कश्मीरमधील निसर्गरम्य पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर व्हायला सुरुवात झालीय. दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांना निर्घृणपणे ठार केले. यामुळे पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पर्यटक कश्मीरला जायला तयार नाहीत. आता कश्मीर टुर नको… आमचे बुकिंग रद्द करा… पैसे गेले तरी चालतील, अशा पर्यटकांच्या भयग्रस्त भावना आहेत. टुर्स अॅण्ड ट्रव्हल्स कंपन्यांकडे कश्मीर सहलींचे बुकिंग रद्द करण्याचे फोन येत आहेत.
एप्रिल-मे महिना म्हणजे कश्मीरसाठी पर्यटनाचा हंगाम. जगभरातले पर्यटक पृथ्वीवरच स्वर्ग समजल्या जाणाऱया कश्मीरमध्ये पोचतात. श्रीनगर, गुलमर्ग, पहलगाम, तिथला हिमवर्षाव, पाइनची जंगलं, तिथले साहसी उपक्रम पर्यटकांना खुणावतात. अलीकडच्या काही वर्षांत कश्मीरच्या पर्यटनात वाढ झालेली आहे. यंदा मात्र कश्मीर खोरे पर्यटकांवाचून ओस पडणार आहे. पहलगामच्या हल्ल्याचा मोठा फटका कश्मिरी पर्यटनाला बसणार आहे. मंगळवारच्या हल्ल्यामुळे पर्यटक आणि टुरिस्ट कंपन्या चिंतेत आहेत. अनेक जण टुर रद्द करण्यासाठी टुर कंपन्यांना फोन करत आहेत, रिक्वेस्ट ई-मेल टाकत आहेत. या आठवडय़ातील अनेक कंपन्यांच्या सहली रद्द झाल्या आहेत.
मे -जून महिन्यातील बुकिंगही रद्द करण्याच्या दृष्टीने विचारणा होतेय. लोक टुरिस्ट कंपन्यांच्या ऑफिसमध्ये पोहचत आहेत. सर्व टुर ऑपरेटर्समध्येही यासंदर्भात बोलणी सुरू आहेत. काही कंपन्यांनी अजून एक-दोन दिवस वेट अॅण्ड वॉचची भूमिका घ्यायचे ठरवले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत योग्य निर्णय घेऊ आणि पर्यटकांनी जास्तीत जास्त रिफंड कसे मिळेल यादृष्टीने प्रयत्न करू, असे टुर ऑपरेटर्स कंपन्यांनी सांगितले.
पहलगाममध्ये सध्या नव्याने येणाऱ्या पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. 25 वर्षांत अशी घटना घडली नव्हती. त्यामुळे साहजिकच पर्यटकांमध्ये मोठी भीती आहे. आगामी बुकिंग रद्द करण्याच्या दृष्टीने विचारणा होतेय. आम्ही त्यांना एक-दोन दिवस थांबा, परिस्थितीचा अंदाज येईल, असे सांगतोय. तरीही काही जण घाबरून टुर्स रद्द करण्याचे तर काही प्लॅनमध्ये बदल करून यायला तयार आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्लॅन्समध्ये बदल करण्यास कंपन्या तयार आहेत. – विश्वजित पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र टुस ऑर्गनायझर्स असोसिएशन/संचालक- राजा-राणी ट्रव्हल्स
आमचे 150 ते 200 लोक श्रीनगरला आहेत. त्यांना पहलगामला नेता आले नाही म्हणून श्रीनगरला ठेवले आहे. या आठवडय़ातील टुर रद्द करण्याच्या रिक्वेस्ट आल्या आहेत. लोकांच्या मनात भीती आहे. आम्ही फक्त परिस्थिती समजावून सांगू शकतो. कुणाला सहलीसाठी जबरदस्ती करू शकत नाही. पर्यटकांना चांगले रिफंड कसे मिळवून देता येईल, ते पाहू. – झेलम चौबळ, केसरी टुर्स
आम्ही सहलींचे प्लॅन्स सात ते आठ महिने आधीपासून करतो. विमान तिकीट, हॉटेलचे बुकिंग होते. मंगळवारची घटनाच भयावह आहे. त्यामुळे साहजिकच लोक घाबरणार. त्यांच्या मनात कश्मीरला जायचं की नाही याची चलबिचल आहे. त्यामुळे आमच्या पुढच्या महिन्यातील सहली कशा होणार याबाबत साशंकता आहे. – कॅप्टन नीलेश गायकवाड, कॅप्टन नीलेश हॉलिडेज