
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात एकिकडे धर्म पेंद्रस्थानी आला असताना, काही पर्यटकांचे अनुभव मात्र मानवता या एकाच धर्माचे दाखले देणारे ठरले. या कठीण प्रसंगी स्थानिकांनी जमेल तशी मदत करत, भयग्रस्त पर्यटकांच्या वेदनेवर फुंकर घालत, अतिथी देवो भवची आठवण करून दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांबरोबर स्थानिक तरुण आदिल शाह याचाही बळी गेला. सय्यद आदिल हुसैन शाह पर्यटकांना घोडय़ावरून फिरवण्याचे काम करत होता. मृत्यूपूर्वी त्याने ज्या पर्यटकाला घोडय़ावरून आणले त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर आदिलने त्याची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रतिकार कमी पडला आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्यात तो इतर पर्यटकांसह ठार झाला.
महाराष्ट्रातील कृष्णा आणि साक्षी लोंढे यांनाही अल्ताफ भाई नावाच्या घोडेस्वाराने या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यास मदत केली. गोळीबाराचा आवाज येईल इतके नजीक लोंढे दांपत्य होते. काहीतरी अघटीत घडल्याचा सुगावा लागताच त्यांच्या घोडेस्वाराने त्यांना तातडीने हॉटेलवर परत नेले. त्याने आणि स्थानिकांनी सावध केले केले नसते तर आपणही या हल्ल्याला बळी पडलो असतो. आम्ही घाबरून गेलो होतो. पण घोडेस्वारांनीच आपल्याला पहलगामच्या बाहेर आणले. जेवण, पाणी दिले. तसेच तुम्हाला काहीही होणार नाही, असे सांगत दिलासा दिला, असा अनुभव कृष्णा आणि साक्षी यांनी सांगितला.
आता कर्ज कसे फेडणार
नाशिकच्या रुपाली ठोंबरे यांचा अनुभवही असाच काहीसा होता. आपले स्थानिक ड्रायव्हर आदिलभाईं यांनी ठोंबरे यांच्यासह सर्व पर्यटकांना स्वतःच्या घरी नेऊन जेवायला घातलं. त्यानंतर सुखरूप हॉटेलवर पोहोचवलं. आदिलभाईंविषयी सांगताना ठोंबरे यांच्या डोळ्यातपाणी तरळलं. या हल्ल्यांमुळे त्यांचा धंदा पूर्णपणे बसणार आहे. गाडय़ांसाठी घेतलेले कर्ज फेडणेही त्यांच्यासाठी कठीण होणार आहे, अशा शब्दांत रूपाली यांनी त्यांच्याविषयी कळकळ व्यक्त केली.