पीडितेचे वास्तव्य असलेल्या परिसरात राहायचे नाही, हायकोर्टाने आरोपीला बजावले

पीडितेचे वास्तव असलेल्या परिसरात राहायचे नाही, असे बजावत उच्च न्यायालयाने बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला.

रुपेश कादळकर असे या आरोपीचे नाव आहे. न्या. मिलिंद जाधव यांनी रुपेशला 15 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. खटल्याचा निकाल लागेपर्यंत रुपेशने पीडिता राहत असलेल्या परिसरात राहू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये यासह अन्य अटी न्यायालयाने आरोपीला घातल्या आहेत.

डीएनए अहवालावर आक्षेप

डीएनए अहवालानुसार रुपेशनेच बलात्कार केल्याचे स्पष्ट होते. या अहवालावर रुपेशने आक्षेप घेतला. याबाबत अधिकाऱ्याची त्याला उलटतपासणी घ्यायची आहे. यासाठी त्याला संधी द्यायला हवी, असेही न्या. जाधव यांनी जामीन मंजूर करताना नमूद केले.

पोलिसांचा होता विरोध

रुपेश पीडितेचा नातलग आहे. जामीन मंजूर केल्यास तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये, अशी मागणी पोलिसांनी केली होती.

काय आहे प्रकरण

पीडिता पुणे येथील आहे. ती रुपेशची नातलग आहे. रुपेश कोपरखैराणे येथे राहतो. पीडिता रुपेशकडे राहायला आली होती. त्या वेळी त्याने तिच्यावर दोन वेळा जबरदस्ती केली. रुपेश नातलग असल्याने तिने याबाबत कोणाला सांगितले नाही. नंतर ती गरोदर राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांत याची तक्रार नोंदवण्यात आली. रुपेशला अटक झाली. गेल्या दोन वर्षांपासून रुपेश कारागृहात आहे. जामिनासाठी त्याने याचिका केली होती. ही याचिका न्यायालयाने मंजूर केली.