
मरीन ड्राइव्ह, ट्रायडेंट हॉटेल, स्टेटस हॉटेल, क्रॉफर्ड मार्पेट, वरळी नाका आणि ओव्हर हायवे ब्रिजखाली मुंबई महानगरपालिकेला अंधारात ठेवून अख्तर आणि संतोष पांडे या दोन व्यक्तींकडून बेकायदेशीररीत्या पार्किंग घोटाळा केला जात आहे. पालिकेच्या संबंधित वॉर्ड ऑफिसरच्या संगनमतानेच हा घोटाळा सुरू असल्याने पालिकेचे कोटय़वधीचे उत्पन्न वाया जात आहे. त्यामुळे या ठिकाणच्या बेकायदा पार्पिंगविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
‘ए’ विभागातील बेकायदा पार्किंगमध्ये दुचाकीना 200 रुपये तर चारचाकी वाहनांना 250 रुपये शुल्क आकारले जात आहे. या घोटाळय़ात वाहनचालकांना बोगस पावत्याही देण्यात येत आहेत. शिवसेनेने हा घोटाळा उघड केला आहे. मुख्य प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनीदेखील याबाबत विधानसभेत विषय मांडून ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली होती. या पार्पिंगमध्ये मुंबई महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता व निविदा न काढता पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा घोटाळा केल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील सर्वच अनधिपृत पार्किंग बंद करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करा, अशी मागणीही प्रभू यांनी केली आहे.
‘रॅकेट’चा शोध घेऊन कारवाई करा!
महापालिकेचे ‘पे अॅण्ड पार्किंग’चे कंत्राट संपल्याने नव्याने टेंडर न काढताच कंत्राटाला परस्पर मुदतवाढ दिल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ‘ए’ विभागातील सहाय्यक अभियंता (परिरक्षण-2) पवन कावरे यांच्याबाबत अनेक तक्रारी आल्यामुळे त्यांचे निलंबित करण्यात आले आहे. मात्र इतक्या मोठय़ा प्रमाणात झालेला घोटाळा एका अभियंत्याकडून करणे शक्य नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून घोटाळय़ाला जबाबदार संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही प्रभू यांनी केली आहे.