
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध कडक कारवाई केली आहे. बुधवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ बैठकीत (CCS) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यात हिंदुस्थानातील पाकिस्तानी दूतावास बंद करणे, सिंधू जल करार स्थगित करणे आणि पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणं थांबवणे यासारखे निर्णय समाविष्ट आहेत. सीसीएसच्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितलं की, सीसीएसच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले, ज्यामध्ये हिंदुस्थानने जल करार स्थगित केला आहे. अटारी सीमा तात्काळ बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानी नागरिकांना हिंदुस्थानात प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि त्यांना व्हिसाही दिला जाणार नाही. तसेच येथे असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.”
माहिती देताना विक्रम मिस्री म्हणाले, “सीसीएसने एकूण सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व दलांना सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले. या हल्ल्यातील गुन्हेगारांना न्यायासमोर आणले जाईल आणि ज्यांनी हे घडवलं आहे त्यांना जबाबदार धरले जाईल, असा निर्णय घेण्यात आला.”