
वैश्विक, [email protected]
नोव्हेंबरच्या 17 किंवा 18 तारखेला दरवर्षी सिंह राशीच्या पार्श्वभूमीवर असणारा उल्का वर्षाव दिसतो. मात्र त्या वेळी (म्हणजे त्या रात्री) तिथी कोणती आहे त्यावर ते अवलंबून असते. नेमकी अमावस्या जवळ आलेली असेल तर रात्री अकरा-साडेअकरापासून सिंह राशीतून अनेक उल्का पडताना दिसतात. त्याची अत्यंत अनुकूल स्थिती असलेल्या वर्षी आकाश निरभ्र असेल तर लिओनिड किंवा सिंह राशीतील उल्का वर्षाव पाहण्यासारखा आनंद नाही. 1998 मध्ये आम्ही तो मुंबईजवळच्या वांगणी येथून अनुभवला होता. कार्यक्रमाची तयारी करताना सुमारे तीन हजार खगोलप्रेमी अपेक्षित होते. म्हणून आधीच्या रात्री फिल्डवर गेलो तर ताशी 200 ते 250 उल्कांचा अक्षरशः तेजस्वी वर्षाव होताना दिसला आणि काही तेजोमय अग्निगोलकसुद्धा (फायरबॉल) दिसले. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी आकाश मेघाच्छादित झाले आणि कार्यक्रमासाठी आलेल्या सुमारे दहा हजार प्रेक्षकांच्या आनंदावर अक्षरशः पाणी पडले!
आकाशदर्शनाला जाताना अशा संभाव्य अपेक्षाभंगाची तयारी मनाशी ठेवावीच लागते, परंतु आमचे तरुण अभ्यासक प्रत्येक वेळी जिद्दीने, जय्यत तयारी करून आणि दुर्बिणी घेऊन आकाशदर्शनाला जातात. फोटोग्राफी करतात. उल्का वर्षाव पाहायला मात्र दुर्बिणीची गरज नसते. नुसत्या डोळ्यांनीच ती अवकाशीय आतषबाजी पाहता येते. कॅमेऱयात एखाद्या सटकन येणाऱ्या वेगवान उल्केचा फोटो ‘पकडता’ आला तर विशेषच. असेही फोटो आमच्या काही अभ्यासकांना मिळाले.
उल्का वर्षाव होतो तो एखाद्या धूमकेतूने पूर्वी कधीतरी सूर्याजवळून, पृथ्वीजवळून जाताना त्याच्या ‘पिसाऱया’तील पिंवा शेपटातील ‘द्रव्य’ मागे टाकलेले असते ते धूलिकण अथवा छोटेसे दगडगोटे. सिंह राशीतल्या उल्का वर्षावाला ‘टेम्पल-टटल’ या जोडगोळीने शोधलेला, त्यांच्याच नावाचा धूमकेतू कारणीभूत आहे. तसेच स्वरमंडल पिंवा ‘लायरा’ या तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवर दिसणारा उल्का वर्षाव ‘थॅचर’ नावाच्या धूमकेतूमुळे होतो. हा धूमकेतू दर 415 वर्षांनी आपल्या सूर्यमालेला भेट देतो. त्याची नोंद साधारणपणे इसवीसनपूर्व 687 पासून घेतली गेली आहे.
स्वरमंडल किंवा लायरा तारकासमूहातून होणाऱया उल्का वर्षावाला ‘लायरिड’ असं म्हणतात. प्रत्येक वर्षी 22 ते 29 एप्रिल या काळात रात्रीच्या आकाशात त्यातून उल्का वर्षाव दिसू शकतो. चमचमत्या क्षणिक उल्कांपासून ते ‘फायरबॉल’पर्यंत अनेक गोष्टी आपल्याला दिसतात. आकाश मात्र काळोखे आणि पूर्णतया निरभ्र हवे.
स्वरमंडल तारकासमूहाच्या पार्श्वभूमीवरचा उल्का वर्षाव असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे एखादा ग्रह ठरावीक ‘राशीत’ असतो याचा अर्थ जसा तो ग्रह त्याच्या कक्षेत फिरता-फिरता त्याची बॅकग्राऊंड बदलते. ती कधी एका राशीच्या, तर कधी दुसऱया राशीच्या पार्श्वभूमीवर (बॅकग्राऊंड) होते. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची नेमकी जागा किंवा अवकाशी ‘पत्ता’ सांगण्यासाठी आपण त्यामागील स्पष्टपणे दिसणाऱया तारकासमूहाचा उल्लेख करतो. वास्तविक ‘लायरा’ किंवा स्वरमंडल (हार्प वाद्यासारखं) तारकासमूह आपल्या सूर्यमालेपासून खूप दूर आहे. (सुमारे 33 हजार प्रकाश वर्षे) त्यातील ताऱयांचा या उल्का वर्षावाशी काहीही संबंध नसतो.
धूमकेतू, सूर्यमालेपलीकडे पृथ्वी ते सूर्य या ‘अॅस्ट्रॉनॉमिकल युनिट’ अंतराच्या सुमारे 1 लाख पट दूर असणाऱया ‘उर्ट क्लाऊड’मध्ये जन्म घेतात. ते त्यांच्या लंबवर्तुळाकार पिंवा अतिलंबवर्तुळाकार गतीनुसार ठरावीक कालक्रमाने आपल्या सूर्यमालेला भेट देऊ शकतात. ‘उर्ट क्लाऊड’मधले सर्वच धूमकेतू सूर्यमालेकडे येत नसतात. काही अगदी छोटे, नगण्य येतात ते ‘सन ग्रेझिंग’ धूमकेतू सूर्याजवळ जाताच त्याच्या गुरुत्वाकर्षणाने खेचले जाऊन त्यात विलीन होतात. असे मात्र शेकडो असतात.
…तर मुद्दा असा की, ‘हॅली’चा धूमकेतू 76 वर्षांनी येतो तसा ‘थॅचर’ धूमकेतूचा पुन्हा सूर्यमालेला भेटण्याचा काळ 415 वर्षांचा आहे. हे धूमकेतू ‘उर्ट’ (हे डच संशोधकाचे नाव आहे) मेघात असताना धूमकेतू बर्फ, दगड आणि वायूचे गोलक असतात. सूर्याजवळ येऊ लागले की, उष्णतेमुळे त्यांचे द्रव बाहेर पडू लागते आणि त्याचे शेपूट होते. धूमकेतू निघून गेल्यावर यातील काही द्रव्य अवकाशात शिल्लक राहते. ते ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात असते तेथून वर्षाकाठी ठरावीक दिवसात होणाऱया उल्का वर्षावाला त्या धूमकेतूचे नाव मिळते.
‘सी/1861 जी1’ अशा वैज्ञानिक नावाचा धूमकेतू ए. इ. थॅचर आणि कार्ल विल्हेम यांनी स्वतंत्रपणे शोधला. तो 5 एप्रिल 1861 या दिवशी (म्हणजे रात्री). तो 3 जून 1861 रोजी सूर्याच्या अगदी जवळ आला होता. कदाचित आपल्या देशातील लोकांनीही तो पाहिला असेल, पण त्याकाळी धूमकेतूबद्दल असलेली धास्ती लक्षात घेता त्याकडे दुर्लक्ष झाले असेल. आता हा धूमकेतू पुन्हा 2283 मध्ये आपल्या सूर्यमालेला भेट देईल, पण तत्पूर्वी एप्रिलमध्ये दरवर्षी 22 ते 29 रात्री 11 नंतर होणारा ‘लायरिड’ उल्का वर्षाव पाहायला मिळतच राहील. यंदा 27 एप्रिल रोजी अमावस्या असल्याने 26 तारखेचा शनिवार हा धूमकेतू पाहायला अगदी योग्य. अर्थात आकाश निरभ्र असेल तरच!