
मंगळवारी (22 एप्रिल 2025) दुपारी जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भयंकर हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून, या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. मृतांमध्ये अनेक पर्यटकांचा समावेश असून, महाराष्ट्रातील नागरिकांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, एका विलक्षण योगायोगामुळे बुलढाण्याच्या जैन कुटुंबाचा जीव वाचला आहे.
ज्येष्ठ पत्रकार अरुण जैन यांचे भाऊ निलेश जैन (मुंबई येथे कार्यरत जीएसटी अधिकारी), त्यांची पत्नी श्वेता, मुलगी अनुष्का आणि अरुण जैन यांची दोन मुले ऋषभ व पारस हे पर्यटनासाठी जम्मू-कश्मीरमध्ये गेले होते. 21 एप्रिल रोजी ते पहलगाममध्ये पोहोचले होते आणि दुसर्या दिवशी म्हणजेच 22 एप्रिल रोजी सकाळी मिनी-स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणार्या प्रसिद्ध साईट-सीन पॉईंटला जाण्याचा त्यांचा बेत होता. मात्र, काही अंतर्गत कारणांमुळे त्यांना निघण्यास 10 मिनिटांचा उशीर झाला आणि याच उशीरामुळे त्यांचा जीव वाचला. कारण, अगदी त्याच वेळी त्या साईटवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला. गोळीबाराची माहिती हॉटेलमध्ये पोहोचताच, जैन कुटुंबाने बाहेर जाण्याचा विचार सोडून दिला. परिणामी, संपूर्ण कुटुंब एका भीषण हल्ल्यातून थोडक्यात बचावले.
सरकारकडे मदतीची मागणी
जैन कुटुंबीयांनी एक व्हिडीओ जारी करून त्यांच्या सुरक्षिततेची माहिती दिली आहे. व्हिडीओत निलेश जैन यांनी सरकारकडे सुरक्षित ठिकाणी हलवण्याची विनंती केली होती. जम्मू-कश्मीर प्रशासनाकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला असून, आता त्यांना लवकरच श्रीनगरकडे हलवले जाणार आहे. ‘संपूर्ण कुटुंब सुरक्षित आहे. आम्ही लवकरच श्रीनगरकडे रवाना होत आहोत. आम्हा सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करणार्या सर्वांचे मनःपूर्वक आभार’, असं अरुण जैन यांनी सांगितलं.
अरुण जैन यांनी म्हटलं, ‘हे आमच्यासाठी दुसर्यांदा जन्मल्यासारखं आहे. त्या क्षणांचा विचार केला की अंगावर शहारा येतो. आम्ही आज जिवंत आहोत हे केवळ एका चूकलेल्या वेळेमुळे हा चमत्कारच आहे.’ महाराष्ट्र सरकारनेही परिस्थितीची गंभीर दखल घेतली असून, राज्यातील सर्व पर्यटकांची माहिती घेण्यासाठी विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही जैन कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व मदत दिली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
Pahalgam Terror Attack- मी कलमा म्हणू शकलो, म्हणून मी वाचलो! प्राध्यापकाची मृत्युच्या दाढेतून सुटका